संजय नेवे,विक्रमगड
बेपत्ता खलाशांच्या कुटुंबीयांना मदत मिळण्याबाबत मुख्यमंत्र्याकडे पाठपुरावा,
खा.डॉ.हेमंत सवरा यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्रालयात भेट घेऊन मतदार संघातील विविध महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा केली.
या भेटीत तीन विषयांवर शासनाकडे ठोस कार्यवाहीची मागणी करण्यात आली.
बेपत्ता खलाशांच्या कुटुंबांना आर्थिक मदत देणे.
४ मार्च २०२५ रोजी समुद्रात झालेल्या अपघातात झाई गावातील चार खलाशी समुद्रात बुडाले होते.यापैकी एकाचा मृतदेह मिळाला असून उर्वरित तीनजण अद्याप बेपत्ता आहेत.या दुर्दैवी घटनेमुळे संबंधित कुटुंबांवर उपजीविकेचे गंभीर संकट ओढवले आहे.तसेच दोन खलाशी गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या सर्व कुटुंबांना तातडीने आर्थिक मदत व शासनाच्या योजनांतून सहाय्य मिळावे, अशी मागणी खा. सवरा केली आहे.
तसेच अर्नाळा किल्ला ते अर्नाळा गाव स्कायवॉक/पूल बांधण्याची स्थानिक ग्रामस्थांची मागणी असुन
वसई तालुक्यातील ऐतिहासिक व पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचा असलेला अर्नाळा किल्ला आणि अर्नाळा गाव यांना जोडणाऱ्या जलमार्गावर सुरक्षित स्कायवॉक/पूल उभारणे आवश्यक आहे.सदर बेटावर सुमारे ५ हजार नागरिक वास्तव्यास असून, विशेषतः पावसाळ्यात समुद्रात उसळणाऱ्या लाटा मुळे येजा करणे शक्य होत नाही.त्यामुळे स्थानिकांना शिक्षण,आरोग्यसेवा व दैनंदिन उपजीविकेसाठी अडचणींना सामोरे जावे लागते.सुरक्षित दळणवळणासाठी तातडीने पूल उभारण्याची गरज असल्याचे खा.डॉ.सवरा यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले.
केंद्र सरकारच्या ४जी सेवा विस्तार प्रकल्पांतर्गत काही गावांची निवड झाली असून स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने अडथळे दूर होत आहेत.मात्र,अजूनही काही तांत्रिक व प्रशासकीय अडचणीमुळे काही गावांमध्ये ४जी सेवा रखडली आहे.त्या अडचणी दूर करून लवकरात लवकर ४ जी सेवा सुरु व्हावी, यासाठीही पाठपुरावा करण्यात आला.
या तिन्ही विषयांवर शासनाने सकारात्मक निर्णय घेऊन तातडीची कार्यवाही करावी, अशी अपेक्षा खा.डॉ.हेमंत सवरा यांनी व्यक्त केली आहे. ही कामे मार्गी लागल्यास स्थानिक नागरिकांचे जीवनमान उंचावेल आणि परिसराच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार आहे .

