जव्हार प्रतिनिधी,
जव्हार येथे राष्ट्रीय पंचायतराज दिन उत्साहात साजरा,
लोकशाहीच्या मूलभूत मूल्यांचा सन्मान आणि ग्रामविकासाची नवी दिशा देणारा २४ एप्रिल राष्ट्रीय पंचायती राज दिन पंचायत समिती, जव्हार येथे उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमात ग्रामपातळीवरील लोकसहभाग,योजनांची अंमलबजावणी आणि पर्यावरण संवर्धन या त्रिसूत्रीचा प्रभावी संदेश देण्यात आला.
सदर कार्यक्रमास पंचायत समिती जव्हार प्रशासक तथा गटविकास अधिकारी दत्तात्रय चित्ते,सहाय्यक गटविकास अधिकारी संदेश दुमाडा,कृषी अधिकारी प्रशांत पाटील, विस्तार अधिकारी ग्रामपंचायत मनोहर उमतोल व सर्व विभागांचे प्रमुख, अधिकारी,महिला अधिकारी, कर्मचारी आणि पंतप्रधान आवास योजनेंतर्गत लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.सदर कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रीय पंचायतीराज दिनाच्या प्रतिज्ञेने झाली. त्यानंतर प्रधानमंत्री आवास योजना ( ग्रामीण ) टप्पा-२ अंतर्गत मंजूर झालेल्या घरकुल लाभार्थ्यांना मंजुरी आदेश,घराची चावी व प्रत्येक लाभार्थ्यांना एक झाड देऊन गौरवण्यात आले.
‘माझं घरकुल – माझं झाड,’ उपक्रमाचे उद्घाटन
या उपक्रमांतर्गत प्रत्येक लाभार्थ्याला एका झाडाचे वाटप करण्यात आले. पर्यावरण संतुलन आणि हरित भविष्यासाठी नागरिकांची जबाबदारी अधोरेखित करणारा हा स्तुत्य उपक्रम उपस्थितांनी भरभरून प्रतिसाद देत अनुभवला.यावेळी गटविकास अधिकारी दत्तात्रय चित्ते यांनी पंचायतीराज व्यवस्थेचे महत्त्व, स्थानिक स्वराज्य संस्थांचे कार्य आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचवण्याबाबत मार्गदर्शन केले. दुपारच्या सत्रात तालुका व्यवस्थापक ( पेसा ) मनोज कामडी यांनी शाश्वत विकास, ग्रामसभा सक्षमीकरण आणि स्थानिक प्रशासनाची जवाबदारी याविषयी अत्यंत समर्पक आणि माहितीपूर्ण मार्गदर्शन करत उपस्थितांमध्ये जनजागृती केली.
पंतप्रधानांचे व्हिडिओ भाषण आणि समारोप
कार्यक्रमाच्या शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राष्ट्रीय पंचायती राज दिनानिमित्तचे लाईव्ह भाषण दाखवण्यात आले.यात ग्रामविकासाचे भविष्यकालीन धोरण, जनतेच्या सहभागाची गरज आणि सरकारच्या आगामी योजना यांचा आढावा घेण्यात आला.शेवटी उपस्थित सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

