सुरेश वैद्य,पालघर
जागतिक वसुंधरा दिनानिमित्त शिरगाव समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम,
जागतिक वसुंधरा दिनानिमित्त स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण ) अंतर्गत आज सायंकाळी शिरगाव समुद्रकिनारी स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात जिल्हाधिकारी डॉ.इंदूराणी जाखर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांच्या प्रमुख उपस्थितीत समुद्रकिनाऱ्यावरील प्लास्टिक कचऱ्याचे संकलन व जनजागृती करण्यात आली.
यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र शिंदे,जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक रूपाली सातपुते,उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( सामान्य प्रशासन) ऐजाज शेख,उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( ग्रामपंचायत ) चंद्रशेखर जगताप,महिला व बालकल्याण अधिकारी प्रवीण भावसार,स्वच्छता विभागाचे प्रकल्प संचालक अतुल पारसकर,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संतोष चौधरी, वित्त व लेखा अधिकारी धनराज पांडे,कृषी अधिकारी पिंजारी,जिल्हा परिषद कर्मचारी,शिरगाव ग्रामपंचायत सदस्य आणि स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या स्वच्छता यंत्राचा वापर करून समुद्रकिनाऱ्याची साफसफाई करण्यात आली.यानंतर उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी स्वतः प्लास्टिक व कचऱ्याचे संकलन करत श्रमदान केले.
जिल्हाधिकारी इंदूराणी जाखर यांनी शिरगाव येथील स्थानिक दुकानदारांशी संवाद साधून, समुद्रकिनारी प्लास्टिकमधील वस्तू विक्री न करण्याचे आवाहन केले.तसेच पर्यटकांनी प्लास्टिक कचरा समुद्रकिनारी न आणू नये, यासाठी सतत जनजागृती आणि कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले.संपूर्ण जिल्ह्यात प्लास्टिकबंदी प्रभावीपणे राबवण्या येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी यावेळी सांगितले की,जिल्ह्यातील ४७३ ग्रामपंचायतींमध्ये सुरू असलेल्या स्वच्छता मोहिमेंतर्गत संकलित प्लास्टिक कचरा स्वच्छ भारत मिशन ( ग्रामीण ) टप्पा २ अंतर्गत उभारण्यात आलेल्या तालुकास्तरीय प्लास्टिक कचरा व्यवस्थापन प्रकल्पात पाठवावा.ज्या तालुक्यांमध्ये हे प्रकल्प नाहीत,त्यांनी स्थानिक प्लास्टिक पुनर्विक्रेत्यांकडे कचरा वर्ग करावाअसे निर्देश त्यांनी दिले.
तालुका स्तरावर देखील आज स्वच्छता मोहीम राबवून कचरा गोळा करण्यात आला.
शाश्वत स्वच्छता,पर्यावरण संवर्धन आणि प्रशासन-जनतेचा एकत्रित सहभागातून हा कार्यक्रम संपन्न झाला.

