वसंत भोईर,वाडा
टायर कंपन्यांच्या परवानग्या देताना पेसा कायद्याला हरताळ,
वाडा तालुका हा अनुसूचित क्षेत्रात येत असून या भागाला पेसा कायदा लागू आहे.या कायद्यामुळे अनुसूचित क्षेत्रात कोणताही कारखाना उभारण्यासाठी ग्रामसभेची मंजुरी आवश्यक असते.पेसा कायद्यान्वये बंधनकारक असताना वाडा तालुक्यातील वडवली येथे टायर कंपन्यांना परवानगी देताना ग्रामसभेची मंजुरी न घेता संबंधित ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी ना हरकत दाखले दिले आहेत.त्यामुळे या सदस्यांनी पेसा कायद्याला हरताळ फासला आहे.
वाडा तालुक्यात टायर कंपन्यांचे पेव सुटले असून सुमारे ७०हून अधिक प्रदूषण कारी टायर कंपन्या उभारण्यात आल्या आहेत.या कंपन्या शासनाच्या नियमांचे उल्लंघन करून सुरू असल्याचे माहिती अधिकारात उघड झाले आहे.यातील ५२ टायर कंपन्या दिवस-रात्र प्रदूषणकारी धूर ओकत असुन त्यांच्या त्रासाने येथील नागरिकांना श्वसनाचे आजार जडले आहेत.या गैरप्रकाराला वडवली ग्रामपंचायतींचा भोंगळ कारभार कारणीभूत ठरला आहे ग्रामपंचायतीने संबंधित टायर कंपन्यांना परवानगी देण्यासाठी ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेमध्ये ठराव घेणे बंधनकारक असताना तसा कोणत्याही प्रकारचा ग्रामसभेचा ठराव न घेता केवल मासिक सभेच्या ठरावाद्वारे ना हरकत दाखला दिला आहे.
दरम्यान प्रदूषण मंडळांनी या ना हरकत दाखल्यावर कारखान्यांना परवानगी दिल्यामुळे आता सर्वसामान्य नागरिक प्रदूषणाचे बळी ठरत आहेत.
माझ्या कार्यकाळात आलेल्या चार टायर कंपन्यांना ग्रामसभेची परवानगी घेऊनच ना हरकत दाखला देण्यात आला आहे.
– ई.डी.मेरे,ग्रामसेवक ग्रामपंचायत वडवली
पेसा कायद्याचे उल्लंघन झाले आहे किंवा नाही ते गटविकास अधिकारी पाहतील,आमचे काम नाही.
– डॉ.सीमा दळवी,प्रदूषण नियंत्रण मंडळ उपप्रादेशिक अधिकारी,कल्याण

