” गावच्या दारी ग्रामपंचायत,”योजनेतर्गत कासटवाडीत लोकाभिमुख उपक्रम,
सरपंच कल्पेश राऊत यांच्या नेतृत्वाखाली “ग्रामपंचायत आपल्या दारी,सर्वेक्षण आपल्या घर,”‘ उपक्रमास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
जव्हार तालुक्यातील कासटवाडी ग्रामपंचायतीने एक अभिनव आणि लोकाभिमुख उपक्रम राबवून जिल्ह्यात आदर्श निर्माण केला आहे.ग्रामपंचायतीच्या सरपंच कल्पेश विनायक राऊत यांच्या संकल्पनेतून ” ग्रामपंचायत आपल्या दारी – सर्वेक्षण आपल्या घरी,” हा उपक्रम नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला.
बहुतेक ठिकाणी ग्रामपंचायत प्रतिनिधी कार्यालयात, न भेटणं अशी नेहमीची तक्रार असते.मात्र कासटवाडी ग्रामपंचायतीने त्या चौकटीला छेद देत संपूर्ण ग्रामपंचायत अधिकारी, कर्मचारी व सदस्य यांनी गावोगाव जाऊन प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्याचा निर्णय घेतला.या उपक्रमांतर्गत मंजूर घरकुल योजना,विकासकामे, प्रधानमंत्री आवास योजना ( ग्रामीण टप्पा २ ) अंतर्गत पात्र कुटुंबांची माहिती,तसेच ग्रामस्थांच्या अडचणी जाणून घेण्यात आल्या.या उपक्रमात सरपंच कल्पेश राऊत, उपसरपंच त्रिंबक रावते, ग्रामपंचायत अधिकारी किशोर सोनवणे,सदस्य शंकर इल्हात, कुणाल सापटा,नितीन चौधरी, नितीन टोकरे,अशोक इंधन, कल्याणी राऊत,सुलोचना चौधरी,मोनिका खिरारी, सुचिता होळकर,चंदा पवार, राजश्री टोकरे,पेसा ग्रामकोष समिती सदस्य,ग्रामरोजगार सेवक व अन्य ग्रामपंचायत कर्मचारी सहभागी झाले होते.उपक्रमाअंतर्गत प्राप्त माहितीच्या आधारे पंधरावा वित्त आयोग,ग्रामनिधी,पेसा निधी,रोजगार हमी योजना, ठक्कर बाप्पा योजना,पीएम जनमन,नागरी सुविधा, जनसुविधा आणि एसएसआरएस यांसारख्या विविध योजनांतून निधीचे नियोजन करून तातडीने विकासकामे हाती घेण्यात येणार आहेत.विशेष म्हणजे, हा उपक्रम दर सहा महिन्यांनी म्हणजेच वर्षातून दोन वेळा राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.कासटवाडीच्या या लोकाभिमुख पुढाकाराचे तालुका आणि जिल्ह्यात कौतुक होत आहे.

