संजय लांडगे,वाडा
जनसुरक्षा विधेयकाच्या निषेधार्थ वाड्यात भव्य मोर्चा,
धर्म,जात,प्रांतांच्या आधारे द्वेष पसरवून सामाजिक एकोपा नष्ट करणाऱ्या राजकारणाच्या विरोधात संविधान,
लोकशाही व स्वातंत्र्याचा गळा घोटून जनसुरक्षा विधेयकाच्या माध्यमातून हुकुमशाही लादण्याच्या विरोधात आज वाड्यात मोर्चा आयोजित करण्यात आला होता.
जातीय अत्याचार,भेदभाव व सर्व प्रकारच्या हिंसेचा व शोषणाचा विरोध करण्यासाठी संविधान,लोकशाही, धर्मनिरपेक्षता,सामाजिक एकोपा,प्रेम व माणुसकीचे रक्षण करण्यासाठी जनसुरक्षा विधेयक मागे घ्या,अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्र सरकारने जनतेच्या अभिव्यक्तीचे व अन्यायाविरोधात संघटित होण्याचे अधिकार संपुष्टात आणण्यासाठी विशेष जन सुरक्षा विधेयक तयार केले आहे.सरकारचे हे विधेयक शहरी नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठी आणण्यात आले असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात जनतेचे ज्वलंत प्रश्न सोडवण्यासाठी संघर्ष करणाऱ्या संघटनांचा आवाज दाबण्यासाठीच हे विधेयक आणण्यात येत आहे. जनतेचे संविधानिक अधिकार काढून घेऊ पाहणाऱ्या राज्य सरकारच्या या कृतीचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष जाहीर निषेध करत असून सरकारने हे विधेयक विनाविलंब मागे घ्यावे,अशी मागणी पक्षाने
केली आहे.
आज किरवली येथील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयातून या मोर्चाला सुरुवात झाली.हा मोर्चा मुख्य बाजारपेठेतून निघून तहसील कार्यालयावर धडकला, कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी शासनाच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या मोर्चात शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.

