जव्हार प्रतिनिधी,
जागतिक वसुंधरा दिनानिमित्त जव्हार अमृतसरोवर येथे तालुकास्तरीय कार्यक्रमाचा भव्य शुभारंभ,
जागतिक वसुंधरा दिनाचे औचित्य साधून आज जिल्हा परिषद पालघर व पंचायत समिती,जव्हार यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.पर्यावरण संवर्धन,जागृती आणि कृती या त्रिसूत्रीच्या आधारे हा उपक्रम राबवण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात पंचायत समिती कार्यालय, जव्हार येथून अमृत सरोवरकडे निघालेल्या जनजागृती रॅलीने झाली. ” वसुंधरेला वाचवा,” ” झाडे लावा,झाडे जगवा”, “स्वच्छ हवा, निसर्ग हवा”, “प्लास्टिक मुक्त व्हा” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
या रॅलीमध्ये गटविकास अधिकारी,सहा.गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी,विविध विभागांचे प्रमुख,महिला कर्मचारी,भारती विद्यापीठ प्रशाला व जिल्हा परिषद काळीधोंड शाळेचे विद्यार्थी-शिक्षक,तसेच स्वयंसेवी संस्था व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
अमृत सरोवर येथे झालेल्या मुख्य कार्यक्रमाची सुरुवात वृक्षपूजनाने करण्यात आली. नंतर ‘वसुंधरा गीत’ व ‘वसुंधरा आरती’ सादर करण्यात आली. त्यानंतर उपस्थितांनी पर्यावरण संरक्षणाची शपथ घेत, प्रत्येकाने एक झाड लावण्याचा संकल्प केला.
दत्तात्रय चित्ते गटविकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली २२ ते ३० एप्रिल दरम्यान विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत.
यामध्ये निसर्ग भित्तीचित्र स्पर्धा,वक्तृत्व स्पर्धा,स्वच्छता मोहिमा,वृक्षारोपण,पाणलोट क्षेत्र संवर्धन,प्लास्टिक मुक्त अभियान,यांचा समावेश आहे.
या उपक्रमांची अंमलबजावणी गावपातळीवर प्रभावीपणे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.प्रत्येक ग्रामपंचायतीने आज स्वच्छता अभियान,वृक्षारोपण व जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन केले.
जिल्हा परिषद व माध्यमिक शाळा, महाविद्यालय या उपक्रमात उत्स्फूर्त सहभागी झाले.
कार्यक्रमामागचा उद्देश म्हणजे सर्व स्तरांमध्ये पर्यावरण संवर्धनाबाबत जागरूकता निर्माण करून निसर्गाविषयी प्रेम,जबाबदारी आणि भान जागवणे.विशेष करून विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासून पर्यावरण जतनाचा दृष्टिकोन तयार करणे,असा आहे.
काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या निसर्ग आधारित घोषवाक्यांची प्रदर्शन मांडण्यात आली.
ग्रामपंचायतींनी स्वच्छता चॅलेंज उपक्रम राबवून स्वच्छ परिसरासाठी वातावरण निर्माण केले.
महिला बचतगटांच्या माध्यमातून कपड्याच्या पिशव्यांचे वाटप आणि प्लास्टिकमुक्ती संदर्भात जनजागृती करण्यात आली.
अशा प्रकारे जागतिक वसुंधरा दिनाचा हा कार्यक्रम केवळ एक औपचारिक उपक्रम न राहता,ती एक चळवळ झाली आहे.

