जव्हार प्रतिनिधी,
जव्हारमध्ये लालपरीची ओढ ; प्रवासी भारावले,
दुर्गम आणि आदिवासी बहुल असलेल्या जव्हार तालुक्यातील नागरिकांना अनेक वर्षांपासून सार्वजनिक वाहतुकीच्या सुविधा अपुऱ्या वाटत होत्या.मात्र,राज्य शासनाच्या प्रयत्नातून जव्हार एसटी आगारात नव्याने दाखल झालेल्या १० अत्याधुनिक लालपरी बसेस मुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.या नव्या बसेसच्या आगमनामुळे प्रवाशांना आता अत्याधुनिक, सुरक्षित आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळणार आहे.
नव्या बसेसमध्ये ४१ आसनी व्यवस्था,प्रत्येक सीटवर दोन मोबाईल चार्जिंग पॉइंट,तसेच नैसर्गिक हवेसाठी दोन सनरूफ,हायड्रोलिक दरवाजे, आणि कुशनबॅग सीटस अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.त्यामुळे उभं राहून प्रवास करण्याचा त्रास आणि दमट हवेमुळे होणारी गैरसोय आता कमी होणार आहे.जव्हार आगारात सध्या ५५ बस कार्यरत असून,प्रवाशांची वाढती संख्या व प्रवासाची गरज लक्षात घेता आणखी दहा बसेस ची गरज होती.ही गरज परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे स्थानिक आमदार,सामाजिक कार्यकर्त्यांनी व स्थानिक प्रशासनाने वेळोवेळी मांडली होती.त्यांच्या पाठपुराव्याला यश आले व दहा बसेस आगारात दाखल झाल्या आहेत.या संदर्भात प्रवासी विनोद डबके म्हणाले, ” नव्या बसेस खूपच चांगल्या आहेत. प्रवास आता अधिक सुखद आणि सोयीचा झाला आहे. प्रवाशांनी देखील या सुविधा नीट वापराव्यात.” या उपक्रमामुळे जव्हारमधील नागरिकांना केवळ प्रवासाची सुविधा नव्हे,तर आधुनिक व्यवस्थेची अनुभूती मिळणार आहे.शासनाच्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत असून, अशाच प्रकारच्या सुविधा अन्य दुर्गम भागांतही उपलब्ध करून द्याव्यात,अशी मागणी ग्रामीण भागातील प्रवाशाकडून करण्यात येत आहे.

