सुरेश वैद्य,सफाळे
विरार – सफाळे दरम्यान प्रायोगिक तत्वावर रो रो सेवा सुरु,
विरार-पालघर दरम्यानचा प्रवास जलदगतीने व्हावा, असा उद्देश डोळ्यासमोर ठेवून खारवाडेश्री (जलसार ) ते मारंबळपाडा ( विरार प.) दरम्यान कालपासून फेरीबोट रो-रो सेवा प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली.त्यामुळे विरार ते पालघर तालुक्यातील प्रवास कमी वेळेत करणे शक्य होणार आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून हा प्रकल्प कार्यान्वित होण्यासाठी प्रयत्न सुरू होते.खारवाडेश्री येथे स्लोपिंग रॅम अर्थात उतार असलेली हंगामी जेट्टीचे काम पूर्ण झाल्याने दोन तालुक्या दरम्यान रो-रो सेवा,सुरु करण्यात आली आहे.
केंद्र सरकारच्या सागरमाला योजनेअंतर्गत या प्रकल्पाची आखणी करण्यात आली होती.या प्रकल्पाला २६ ऑक्टो.२०१७ रोजी १२.९२ कोटी रु.च्या खर्चाला प्रशासकीय मंजुरी देण्यात आली.नंतर १५ मार्च २०२३ रोजी २३.६८ कोटी रु.च्या सुधारित प्रस्तावाला मान्यता देण्यात आली.पर्यावरण विषयक तसेच उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाकडून या कामाबाबत परवानगी देण्यात आली.
नारिंगी व चिखलडोंगरे या विरार शहराच्या पश्चिम भागात असणाऱ्या मारंबळपाडा येथील जेट्टीचे काम ऑगस्ट २०२१ मध्ये पूर्ण झाले.तर या जेट्टीकडे जाणारा अँप्रोच रस्त्याच्या कामासाठी ३० कोटी रु.खर्च करण्यात आला आहे.सध्या तात्पुरत्या स्वरूपात उतार व्यवस्था अर्थात स्लोपिंग रॅम्पचे काम पूर्ण झाले असून,या तात्पुरत्या रॅम्पला दगडी मजबुतीकरण व जेट्टीकडे जाणाऱ्या अँप्रोच रस्त्याचे काम पूर्ण झाले. त्यामुळे कालपासून ही सेवा प्रायोगिक तत्वावर सुरु करण्यात आली आहे.
रो रो सेवा चालवण्यासाठी मे. सुवर्णदुर्ग शिपिंग अँड मरीन सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला कंत्राट देण्यात आले आहे.या मार्गावर कार्यरत राहणाऱ्या फेरीबोटीचे जल मार्गातून होणारे नौकानयन तसेच वाहनांची चढ – उतार करण्याबाबत सुलभता व सुरक्षितता अभ्यास करून नंतर औपचारिक लोकार्पण करण्यात येईल,असे महाराष्ट्र सागरी मंडळाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे.
अंतर व वेळेची बचत
खारवाडेश्री ते नारंगी असे रस्ते मार्गे अंतर ६० कि.मी.असून त्याला दीड तासांचा कालावधी लागतो.हा प्रवास जलमार्गाने केल्यास दीड कि.मी.चे अंतर असून त्याकरिता साधारण १५ मिनिटांच्या कालावधी लागणे अपेक्षित आहे.या रो-रो सेवेमुळे विरार,वसई तसेच सफाळे,केळवे परिसरातील स्थानिक नागरिकांना व पर्यटकांना दोन तालुक्यांमधून ये-जा करणे सुलभ होणार आहे.ही सेवा सध्या पहिल्या टप्प्यात सूरू करण्यात आली असुन दुसऱ्या टप्प्यात तीचा थेट पालघरपर्यंत विस्तार होणार आहे.

