दीपक मोहिते
राज्याच्या ग्रामीण भागात हंडाभर पाण्यासाठी महिलांची पायपीट सुरू..
राज्यात सर्वत्र भीषण पाणीटंचाईने डोके वर काढले आहे.ग्रामीण भागातील विहिरी,तलाव,बोअरिंग यातील पाण्याची पातळी खाली गेली असून महिला जीव धोक्यात घालून हंडाभर पाण्यासाठी विहिरीत उतरत आहेत. पण स्थानिक प्रशासनाना त्याची चाड नाही.अद्याप साखरझोपेत असल्याचे पाहायला मिळत आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दररोज आपल्या भाषणात, पाणीटंचाई संपुष्टात आणण्यासाठी शासन कटिबद्ध असून जलजीवन मिशन,हर घर जल,जल शिवार,अशा वारेमाप घोषणा करत सुटले आहे.पण यवतमाळ व पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील महिला हंडाभर पाण्यासाठी वणवण फिरत आहेत.
जव्हार तालुक्यातील अतिदुर्गम भागात असणाऱ्या वावर – वांगणी ग्रामपंचायत हद्दीतील सागपाणी व रिठीपाडा गावात हंडाभर पाणी भरण्यासाठी महिलांची विहरींवर झुंबड उडत आहे.सागपाणी व रिठीपाडा गावात सालाबादप्रमाणे डिसें.अखेरपासून तीव्र पाणीटंचाई सुरू झाली आहे.त्यामुळे या दोन्ही पाड्यावरील ग्रामस्थ, सरपंच व ग्रामसेवक यांनी पाणीपुरवठा अधिकारी आणि गटविकास अधिकारी पंचायत समिती जव्हार,यांचेकडे टँकरची मागणी केली.परंतु पंचायत समिती जव्हार कडून अजूनही टँकर हा मंजूर झालेला नाही.येथील जलजीवन मिशनच्या ठेकेदाराने ४ दिवस टँकर चालू केला होता.परंतु चालू असलेला टँकर बंद करून आता सागपाणी आणि रिठीपाडा गावांना सध्या स्थितीत पिकअपमध्ये लहान पाण्याची टाकी ठेवून या दोन गावांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे.परंतु या टाकीमध्ये पाण्याचा पुरेसा साठा होत नसल्यामुळे महिलांची मोठ्या प्रमाणात झुंबड उडत असते.तसेच हंडाभर पाणी भरण्यासाठी महिला- महिलांमध्ये भांडणे होत असतात.त्यामुळे येथील नागरिक हे मोठ्या टँकरची मागणी करत आहेत.
या गावातील महिलांना सध्या पाणी भरण्यासाठी रात्री बे रात्री वणवण भटकत फिरावं लागतं आहे.त्यामुळे प्रशासन अजून दिवस आदिवासी नागरिकांना तहानलेले ठेवणार ? असा संतप्त सवाल महिला विचारत आहेत.यवतमाळ जिल्ह्यात तर पाणीटंचाई अत्यंत भीषण अशी झाली असून हंडाभर पाण्यासाठी महिला जीव धोक्यात घालून विहिरीत उतरतात व पाणी भरत आहेत.

