वसंत भोईर,वाडा
वडवली येथील कारखान्यावर कारवाई करण्याची ग्रामस्थांची मागणी,
तालुक्यातील वडवली ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या टायर सायकलिंग करणाऱ्या कंपन्यांमुळे या परिसरात वायु प्रदूषण, जलप्रदूषणामुळे पंचक्रोशीतील जनता त्रस्त झाली आहे.या प्रदूषणकारी कारखान्यांमुळे वडवली,नारे,मुसारणे,चिंचघर या गावातील नागरिक हैराण झाले आहेत.
स्थानिक नागरिकांच्या जीवावर उठलेल्या या कारखान्यांमुळे नागरिकांचे आयुष्य उध्वस्त होण्याची वेळ आली आहे.शासनाच्या नियमांचे उल्लंघन करून अनाधिकृतरित्या सुरू असलेल्या या टायर कंपन्यांवर कारवाई करण्याची मागणी या परिसरातील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
वडवली येथील या कंपन्यांमध्ये जुने टायर जाळून त्यापासून ऑइल तारा काढून त्याची विक्री मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे.प्रदूषित रासायनिक सांडपाणी हे येथील नाल्यात सोडत असल्यामुळे नाल्यातील मासे मरून पडले आहेत.तर दूषित पाणी पिल्यामुळे जनावरे ही मृत्युमुखी पडल्याची अनेक उदाहरणे आहेत.वारंवार या कंपन्यांमध्ये होणाऱ्या अपघातामध्ये मध्यंतरीच्या काळात निष्पाप नागरिकांना नाहक आपला जीव गमवावा लागला.सद्यस्थितीत या कंपन्या विरोधात स्थानिक नागरिक एकवटले असून स्थानिक पातळीवर त्यांचा लढा सुरू आहे.येथील ग्रामस्थांनी या कंपन्यांची तक्रार पालकमंत्री गणेश नाईक यांच्याकडे केल्यामुळे यातील प्रदुषणकारी नऊ कंपन्या बंद करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले.त्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाने त्या बंद केल्या.
वडवली गावाच्या हद्दीत इतरही काही कंपन्या अजूनही धूर ओकत असून त्याही नियमांचे उल्लंघन करून सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.त्यामुळे सर्व सामान्य नागरिकांना होणारा त्रासाचा विचार करून प्रदूषणकारी कारखान्यांवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
आमच्या परिसरातील प्रदूषण कारखाने जोपर्यंत बंद होत नाहीत,तोपर्यंत आमचा हा लढा सुरूच राहणार आहे.
– कल्पेश पाटील, ग्रामस्थ
.

