नवीन पाटील,सफाळे
महिलांच्या टी २० स्पर्धेत भारत क्रिकेट क्लब विजयी,
मुंबई क्रिकेट असो.व डॅशिंग क्रिकेट क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या डॅशिंग सुपर वुमन कप टी २० स्पर्धेमध्ये मुंबई येथील भारत क्रिकेट क्लबने पीडीटीएस संघाचा दारुण पराभव करत अंतिम विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
पालघर येथील सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर अंतिम सामना खेळला गेला.या स्पर्धेमध्ये १२ संघ सहभागी झाले होते.ही स्पर्धा चार दिवस साखळी पद्धतीने खेळवण्यात आली. अंतिम सामन्यात मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सहसचिव दीपक पाटील,माजी उपाध्यक्ष पंकज ठाकूर,सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळीचे अध्यक्ष सचिन कोरे,प्राचार्य किरण सावे,भूषण पाटील,विकास पाटील आणि मान्यवर पारितोषिक वितरण प्रसंगी उपस्थित होते.
या स्पर्धेमध्ये मालिकावीर म्हणून शर्वी सावे हीला गौरवण्यात आले.तर सिमरन शेख ही सर्वोत्तम फलंदाज ठरली,कशीष निर्मल हीने सर्वोकृष्ट गोलंदाजाचा मान पटकावला तर निर्मिती राणे हीला सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षणाच्या किताबाने गौरवण्यात आले.
अशा स्पर्धा आयोजित करण्याचा उद्देश असतो की यामधून चांगले खेळाडू निर्माण व्हावेत,जशा राज्यस्तरावरील क्रिकेटच्या स्पर्धा होतात, तशाच पद्धतीने ही स्पर्धा भरवण्याची परवानगी मुंबई क्रिकेट असोसिएशनने डॅशिंग क्रिकेट क्लबला दिली.पालघर जिल्ह्यात क्रिकेटची आठ ते दहा मैदाने उपलब्ध आहेत. मुंबईहून आलेल्या खेळाडूंना वाटेल की एवढ्या लांब यायचं कसं ? तर वर्षानुवर्ष या भागातून आमची मुलं आणि मुली सकाळी चार वाजता उठून मुंबईला येऊन क्रिकेट खेळत असत.क्रिकेटसाठी संघर्ष करावा लागतो व मेहनत ही करावी लागते,असे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सहसचिव दीपक पाटील यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करतानाm सांगितले.
ते पुढे आपल्या भाषणात म्हणाले,क्रिकेट हा ११ खेळाडूंचा खेळ आहे.प्रत्येक खेळाडूचे यामध्ये योगदान महत्त्वाचे असते.मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये शिस्त व वृत्तीला महत्त्व दिले जाते. मुलींसाठी वर्षभरात पंधरा ते वीस स्पर्धांचे आयोजन करण्यात येते.वर्षभर तुमच्यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशन विविध स्पर्धा आयोजित करत असते, त्यामुळे तुम्ही सांगू शकत नाही की आम्हाला संधी मिळाली नाही.तुम्हाला व्यासपीठ उपलब्ध आहे,
तुम्ही खेळत राहा,तुमचा खेळ बहरत राहील.

