वसंत भोईर,वाडा
गांध्रे बंधा-यावर श्रमजीवीचे आंदोलन,
तालुक्यातील कुडूस येथे कोकाकोला कंपनी असून या कंपनीला वैतरणा नदीवरील गांध्रे येथे बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यातून पाणी देण्यात आले आहे.या नदीपात्रालगत असलेल्या आबिटघरसह १७ गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याने कंपनीला देण्यात येणारे पाणी तत्काळ बंद करावे,या मागणीकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज पासून बंधाऱ्यावर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.
या कंपनीत शितपेये व बाटलीबंद पाण्याचे उत्पादन घेण्यात येते.या कंपनीला वैतरणा नदीवरील गांध्रे येथे बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यातून पाणी पुरवठा केला जातो.कंपनी ०.६१ द.ल.घ.मी.इतके पाणी शासन निर्णयानुसार देण्यात आले आहे.मात्र कंपनी त्यापेक्षा अधिक पाणी उपसा करीत असल्याचा आरोप श्रमजीवी संघटनेने निवेदनात केला आहे.या नदीपात्रालगत आबिटघर व इतर १७ गावांसाठी जलजीवन मिशन अंतर्गत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातर्फे पाणीपुरवठा योजना राबवण्यात आल्या आहेत.
मात्र सद्यस्थितीत कोकाकोला कंपनी जलसंधारण विभागाने मंजूर केलेल्या पाण्यापेक्षा अधिक पाण्याचा उपसा करत असल्यामुळे त्या पाण्यावर अवलंबून असणा-या १७ गावांना सध्या पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
या आंदोलनात श्रमजीवी संघटनेचे सरचिटणीस विजय जाधव,तालुका अध्यक्ष भरत जाधव,सचिव सुरज दळवी, किशोर मढवी,मिरा टोकरे, सुजाता पारधी या पदाधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.
या आंदोलनात अनुचित प्रकार घडू नये,म्हणून पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.दरम्यान हे आंदोलन सुरूच राहील,असा निर्धार संघटनेचे सरचिटणीस विजय जाधव यांनी व्यक्त केला आहे.

