शशिकांत ठाकूर,कासा
राष्ट्रीय महामार्गावर प्रचंड वाहतूककोंडी ; वाहनचालक त्रस्त,
डहाणू तालुक्यातील महालक्ष्मी यात्रेला गेल्या शनिवारपासून सुरुवात झाली असून दर्शन व जत्रेकरीता गुजरात वरून येणाऱ्या भाविकांमुळे मुंबई अहमदाबाद महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे.सलग तीन दिवस सुट्टी आल्यामुळे वाहनांच्या लांब रांगा महामार्गावर लागल्या आहेत.
पालघर जिल्ह्याच्या डहाणू तालुक्यातील महालक्ष्मी यात्रेला १२ एप्रिल पासून सुरुवात झाली आहे.ही जिल्ह्यात मोठी यात्रा म्हणून ओळखली जाते.
१५ दिवस चालणाऱ्या महालक्ष्मीच्या यात्रेत मुंबई,ठाणे,गुजरात व आजूबाजूच्या शहरातून लाखोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात. सलग तीन दिवस सुट्टी आल्यामुळे तसेच जत्रेचा दुसरा दिवस असल्याने गुजरात तसेच राजस्थान येथून मोठ्या प्रमाणावर भाविक आले आहेत.
त्यामुळे गुजरातकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे.२५ कि.मी.टरचे अंतर पार करण्यासाठी तीन ते चार तासाचा अवधी लागत आहे. या वाहतूक कोंडीचा फटका दैनंदिन मालवाहू गाड्या, भाविक,बाहेरगावी जाणारे प्रवासी व इतर वाहन चालकांना बसला आहे.

