दीपक मोहिते,
भूषण गवई होणार सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायधीश,
विद्यमान सरन्यायाधीश संजीव खन्ना निवृत्त झाल्यानंतर पुढील सरन्यायाधीश कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ न्यायमूर्ती भूषण गवई हे ५२ वे सरन्यायाधीश होणार आहेत. भूषण गवई नेमके कोण आहेत ? त्यांची आत्तापर्यंतची कारकीर्द कशी होती याविषयी आपण जाणून घेऊया.म
महाराष्ट्रातील प्रसिद्ध विधिज्ञ आणि आंबेडकरी चळवळीचा वारसा लाभलेले न्यायमूर्ती भूषण गवई देशाचे सरन्यायाधीश होणार आहे.ते ५२ वे सरन्यायाधीश म्हणून १४ मे रोजी शपथ घेणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू त्यांना सरन्यायाधीश पदाची शपथ देतील.भूषण गवई हे भारतीय रिपब्लिकन पक्षाचे दिवंगत नेते,माजी आमदार,खासदार आणि बिहार,सिक्कीम व केरळ राज्यांचे राज्यपाल राहिलेले रा.सु.गवई आणि कमलाताई गवई यांचे पुत्र आहेत.भूषण गवई यांचे वडील रामकृष्ण गवई आंबेडकर चळवळीतील सक्रिय नेते होते. राज्यसभेचे खासदार तसेच केरळ आणि बिहारचे राज्यपाल म्हणून देखील त्यांनी काम पाहिले आहे.भूषण गवई यांचा जन्म २४ नोव्हें.१९६० रोजी अमरावती येथे जन्म झाला.१९८५ मध्ये त्यांनी वकिलीची सुरुवात केली. त्यांनी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती दिवंगत बॅरिस्टर राजा एस.भोसले यांच्यासोबत काम केले.गवई यांनी मुंबई उच्च न्यायालयात वकीली करून नंतर ते नागपूरला आले.नागपूर महानगरपालिका,अमरावती महानगरपालिका आणि अमरावती विद्यापीठासाठी स्थायी वकील म्हणून देखील त्यांनी काम पाहिले आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाईटवर भूषण गवई यांच्या विषयी माहिती देण्यात आली आहे.त्यामध्ये ऑगस्ट १९९२ ते जुलै १९९३ या कालावधीत त्यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सहा.सरकारी वकील आणि अतिरिक्त सरकारी अभियोक्ता म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. जाने.२००० मध्ये नागपूर खंडपीठासाठी त्यांची सरकारी वकील म्हणून नियुक्त करण्यात आली होती.
१४ नोव्हें. २००३ रोजी मुंबई उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायाधीश म्हणून त्यांची पदोन्नती झाली.१२ नोव्हे. २००५ रोजी कायम न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्त्ती करण्यात आली.गवई यांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी २४ मे २०१९ मध्ये नियुक्ती झाली होती. तर,आता ते १४ मेला सरन्यायाधीशपदाची शपथ घेणार आहेत.तर २३ नोव्हें. २०२५ ला निवृत्त होतील. त्यामुळे सरन्यायाधीश म्हणून त्यांना सहा महिन्याचा कार्यकाल मिळणार आहे.
न्यायमूर्ती भूषण गवई यांनी सर्वोच्च न्यायालयात काही नवीन प्रथा सुरु केल्या आहेत. त्यांनी जनहित याचिकांच्या सुनावणीसाठी आठवड्यातून एक दिवस निश्चित केला. सर्वसामान्य लोकांसाठी त्यांनी अनेक आदेश दिले.त्यांनी उत्तर प्रदेशात सुरु झालेले आरोपींच्या घरांवरील बुलडोझर कारवाईच्या विरोधात सरकारला चांगलेच फटकारले होते.सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश होणारे नागपूर बार असोसिएशनचे ते तिसरे सदस्य आहेत.यापूर्वी न्यायमूर्ती मोहम्मद हिदायतुल्ला आणि शरद अरविंद बोबडे सरन्यायाधीश झाले होते.

