दीपक मोहिते,
नवीन बंधाऱ्यामुळे जुली बेट सुरक्षित ; सुमारे तीन हजार स्थानिक भूमिपुत्र सुखावले,
वैतरणा खाडीतील जुली बेटाच्या संवर्धनासाठी जलसंपदा विभागाने जुली खारभूमी योजनेला मंजुरी दिली आहे.या योजनेअंतर्गत बेटाच्या संरक्षणासाठी बंधारा बांधण्यात येणार असून त्यासाठी ११ कोटी ८८ लाख रू.च्या निधीला विशेष बाब म्हणून प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.या निर्णयामुळे या बेटावरील सुमारे तीन हजार स्थानिक ग्रामस्थांना दिलासा मिळणार आहे.
विरार पश्चिमेस ४ कि.मी. अंतरावर वैतरणा खाडीत जुली बेट आहे.या बेटावर ३ हजारांच्या आसपास लोकसंख्या आहे.या बेटाच्या चोहोबाजूला खाडी असल्यामुळे खारभूमी योजनेअंतर्गत जुली बेटाच्या संरक्षणासाठी बेटाला बंधारा बांधण्यात आला होता. त्यासाठी जुली खारभूमी योजना राबवण्यात आली होती.मात्र या बेटाच्या परिसरात प्रचंड वाळू उपसा झाल्यामुळे या जुली बेटाला धोका निर्माण झाला आहे.बेटावरील ग्रामस्थांनी विविध स्तरावर प्रयत्न केले, पण नोकरशाहीकडून पदरात कायम उपेक्षा पडल्यामुळे स्थानिक ग्रामस्थानी अखेर मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती.या याचिकेवर न्यायालयाने राज्य सरकारला योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते.त्यानंतर कोकण विभागाच्या मुख्य अभियंत्यांनी अंदाजपत्रक तयार केले.या अंदाजपत्रकानुसार राज्य सरकारने सुमारे ११ कोटी ८८ लाख रु.च्या निधीला प्रशासकीय मंजुरी दिली.या निधीतून आता येथे अडीच कि.मी.लांबीचा बंधारा बांधण्यात येणार आहे.येथे छुप्या रीतीने होणाऱ्या वाळू उपशामुळे जुन्या बंधाऱ्याला अनेक भगदाडे पडली होती.स्थानिक ग्रामस्थ आपल्यापरीने ही भगदाडे बुजवण्याचा प्रयत्न करत असत,पण महाकाय लाटामुळे ते शक्य होत नव्हते.आता नवीन बंधारा बांधण्यात येत असल्यामुळे ग्रामस्थामध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.या नवीन बंधाऱ्यामुळे हे बेट आता सुरक्षित झाले असल्याचे मत स्थानिक ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

