सुरेश वैद्य,पालघर
पालघर येथे जय भीम पदयात्रा संपन्न,
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला अनेक गोष्टी शिकवल्या.त्यापैकी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, ही शिकवण विद्यार्थ्यांनी आचरणात आणली पाहिजे असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी केले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती निमित्ताने पालघर जिल्ह्यात जय भीम पदयात्रा काढण्यात आली.त्यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे बोलत होते.
यावेळी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
रानडे पुढे म्हणाले की,बाबासाहेबानी आपल्याला ज्या तीन गोष्टी शिकवल्या आहेत त्याचे पालन करावे. बुद्धिमतेचा विकास करणे,हे आपले ध्येय असले पाहिजे. सगळ्यात महत्वाचे हक्क कधी मागून मिळत नसतात त्यासाठी संघर्ष करावा लागतो. शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे. जो पिणार तो नक्कीच गुरगुरणार म्हणजे आपल्या हक्कासाठी संघर्ष करणार,हे विद्यार्थी यांनी लक्षात ठेवावे.बाबासाहेब आंबेडकर यांची लिखित संपदा पुस्तके आहेत,ती नेहमी वाचली पाहिजेत.तत्कालीन परिस्थिती काय होती आणि आपल्याला पुढे कुठे जायचं आहे, हे प्रत्येकाला कळलं पाहिजे.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती उद्या १४ एप्रिल रोजी आहे.या जयंतीचे औचित्य साधून मुंबईसह राज्यभर आज “ जय भिम पदयात्रा” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.त्यानुसार पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने “ जय भिम पदयात्रा,” काढण्यात आली होती.ही पदयात्रा पाचबत्ती येथून सुरु करण्यात आली आणि डॉ.आंबेडकर चौक येथे समाप्त करण्यात आली.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे,जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास.व्हनमाने,तसेच अधिकारी,नागरिक आणि विद्यार्थी या पदयात्रेत सहभागी झाले होते.
पालघर जिल्ह्यातील विविध विद्यालयातील विद्यार्थी,एनसीसी,एनएसएस, एनवायकेएस,भारत स्काउट गाईड,माय भारत यामधील विद्यार्थी मोठ्या संख्येने या पदयात्रेत सहभागी झाले होते.

