मनिष धानू,डहाणू
डहाणूच्या प्रसिद्ध महालक्ष्मी यात्रेस प्रारंभ,
डहाणू तालुक्यातील चारोटी जवळ मुंबई – अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर विवळवेढे येथे श्री महालक्ष्मी देवीचे मंदिर आहे.हे जागृत देवस्थान मानले जात असून ही देवी नवसाला पावते,असा लाखो भाविकांचा विश्वास आहे.ठाणे व पालघर जिल्ह्यातील भाविकांबरोबर गुजरातमधील भाविक येथे मोठ्या प्रमाणात येतात.गुजरातमधील भाविकांची या देवीवर विशेष श्रध्दा आहे.देवीची यात्रा सुरू झाली असून सतत पंधरा दिवस चालणाऱ्या यात्रेसाठी भाविकांच्या सोयीसुविधा व सुरक्षिततेची जय्यत तयारी असल्याची माहिती श्री महालक्ष्मी ट्रस्टतर्फे देण्यात दिली.यात्रेदरम्यान प्रचंड आर्थिक उलाढाल होत असते.पालघर,ठाणे या जिल्ह्यातून तसेच शेजारच्या गुजरात राज्यातून लहान मोठे व्यापारी येथे भरणाऱ्या बाजारात माल माल विक्रीसाठी घेवून येत असतात.
या महालक्ष्मी देवीला होमाच्या दिवशी जव्हारच्या राज घराण्याकडून प्रतिवर्षी खणा नारळांची ओटी भरून साडी चोळी अर्पण करून पाच मीटर लांब झेंडा फडकवला जातो.ही प्रथा अजूनही परंपरेनुसार सुरू आहे.चैत्र महिन्याच्या पौर्णिमेपासून ही यात्रा सुरू होत असली तरी वर्षभर देवीचे नवरात्र आदी उत्सव मोठ्या उत्साहात होतात.यात्रेदरम्यान चैत्र पौर्णिमेला पहिला व अष्टमीला दुसरा होम असतो.या शक्तीमातेला येथील आदिवासी समाजाबरोबरच कुणबी, मांगेला,गुजराती समुदाय आपली कुलस्वामीनी मानतो. या मंदिरातील पुजारी आदिवासी समाजातील सातवी कुटुंबातील आहेत.
महालक्ष्मी मातेच्या अनेक आख्यायिका असून देवी डहाणूला स्थायिक कशी झाली.याबाबत असे सांगितले जाते की,कोल्हापूरच्या महालक्ष्मीला गुजरातमध्ये वास्तव्य करण्याची इच्छा झाली असता,वाटेत विवळवेढे डोंगराजवळून जात असताना विश्रांतीसाठी देवी मुसल्या डोंगराजवळ गेली.पुढे देवीला भक्तांची आवश्यकता वाटली. येथील कान्हा ठाकूर नावाच्या व्यक्तीस देवीने स्वप्नात जाऊन दृष्टांत दिला व पुजा करण्यास सांगितले.कान्हा ठाकूर मोठ्या श्रद्धेने पुजा करू लागले आणि देवी डहाणूला विवळवेढे येथे स्थायिक झाल्याची नोंदी पुराणात आहेत.व महालक्ष्मी देवीच्या प्रसिद्ध केलेल्या पुस्तकात आहे.
चैत्र शुद्ध पौर्णिमेला पहिल्या होमाच्या दिवशी मध्यरात्री बारा वाजता पुजारी ध्वज, पुजेचे साहित्य नारळ घेऊन वेगाने पायथ्याच्या मंदिरापासून धावत निघतो.तीन वाजता तो डोंगरावर पोहोचतो व तेथे तुपाचा दिवा लावून ध्वज फडकवतो व सकाळी ७.०० वाजता परत येतो.हे दृश्य पाहण्यासाठी असंख्य भाविक मार्गात बसलेले असतात.त्यावेळी त्याच्या अंगात देवी संचारते,असे म्हणतात.ध्वज लावण्याचे ठिकाण डोंगरावरील देवीच्या पूजेच्या स्थानापासून सहाशे फुट उंचीवर आहे.ध्वज लावण्यासाठी जो खांब असतो तो दर पाच वर्षांनी बदलला जातो.ध्वज लावण्याचे हे देवकार्य वाघाडी येथील मोरेश्वर सातवी परंपरेने करतात.
प्रसिद्ध महालक्ष्मी मातेचे मूळ वास्तव तेथे एका डोंगरावर आहे.परंतु या डोंगरमाथ्यावर जाणारी वाट अत्यंत अडचणीची व धोकादायक असल्यामुळे देवीचे पुजारी व भाविकांच्या सहकार्याने मंदिर डोंगर पायथ्याशी बांधण्यात आले.परंतु आता मात्र दानशूर भाविक नारायण जावरे यांच्या प्रयत्नाने देवीचे मंदिर मुळ वास्तव असलेल्या डोंगरावरही सुंदर मंदिर बांधले आहे. त्यास ” महालक्ष्मी गड,” म्हणून ओळखले जाते.ही महालक्ष्मीदेवीची यात्रा पंधरा दिवस चालते,या काळात लाखो भाविक देवीचे दर्शन घेत असतात.

