दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
आम्हाला फोटोशूट नकोय ; पाणी हवंय – ग्रामस्थांचा आक्रोश,
कासा येथे जाऊन रोहित्र लोड करत असताना समोर उभे राहून फोटोशूट करण्याने कामण,चिंचोटी,देवदळ,
भागातील गोरगरीब जनतेची तहान भागवता येणार नाही.त्यासाठी स्वतःच्या सरकारच्या उरावर बसण्याची हिंमत दाखवण्याची गरज आहे.
आज वसई,नालासोपारा या परिसरात पाणीटंचाई तीव्र स्वरूपात जाणवू लागली आहे.ग्रामीण भागातील जनतेच्या घश्याला कोरड पडली आहे.ज्या पाण्याच्या प्रश्नावर रान उठवत आमदार निवडून आले आहेत,ते आमदार सध्या फोटोशूटमध्ये मग्न आहेत.निवडणुकीच्या प्रचारात ” आम्ही लवकरात लवकर पाणी आणू,” अशा सिंहगर्जना करणारे तथाकथित नेते आता केवळ आश्वासने देण्यात धन्यता मानत आहेत.दुसरीकडे टँकर लॉबीनेही टँकरचे भाव भरमसाठ वाढवल्यामुळे सर्वसामान्य नागरिक अक्षरशः मेटाकुटीला आला आहे.वास्तविक उन्हाळा सुरू झाला की तालुक्यात पाणीटंचाईला सुरुवात होते.अशावेळी लोकप्रतिनिधींनी तहसीलदाराना सांगून टँकरवाल्यांची बैठक बोलावून टँकरचे दर निश्चित करायचे असतात.पण ते न करता आमदार महोदय,हे पाईपलाईन,रोहित्राच्या बाजूला फोटोशूट करून समाज माध्यमांवर पोस्ट करत आहेत.ही जनतेशी एकप्रकारची प्रतारणा आहे,असेच म्हणावे लागेल.लोकांना पाणी हवंय,कारण अनेक भागात तीन दिवस आड पाणी देण्यात येत आहे.दोन दिवसांपूर्वी कामण,चिंचोटी,देवदळ व अन्य गावातील ग्रामस्थांनी ” जी,” प्रभाग समितीवर आक्रोश मोर्चा नेला होता.त्यामुळे आमदारांनी पाणीटंचाईचे गांभीर्य लक्षात घेऊन हे फोटोशूट थांबवून प्रत्यक्ष कृती करावी,अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

