राजन अधिकारी,बोईसर,
पालघर जिल्ह्यात उद्योगवाढीसाठी २२०० कोटीची गुंतवणूक,
पालघर जिल्ह्यात औद्योगिक विकासाला चालना देण्याकामी राज्य उद्योग व पालघर जिल्हा उद्योग केंद्र यांच्या संयुक्त प्रयत्नातून तारापूर येथे गुंतवणूक परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा प्रशासनाच्या या स्तुत्य अशा प्रयत्नाचे सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे.जिल्हाधिकारी डॉ,इंदु राणी जाखड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या गुंतवणूक परिषदेत विविध उद्योगासमवेत जवळपास २२०० कोटी रु.चे सामंजस्य करार करण्यात आले.
पालघर जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेत १५८ कंपन्या सहभागी झाल्या होत्या.या प्रस्तावित गुंतवणुकीतून जिल्ह्यात अंदाजे सहा हजार प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराची निर्मिती होणार असल्याचा दावा जिल्हा उद्योग केंद्रातर्फे करण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी गुंतवणूक परिषदेत केलेल्या आपल्या भाषणात म्हणाल्या,जिल्ह्यात उद्योगांना आकर्षित करून अधिकाधिक गुंतवणूक आणण्यासाठी रस्ते, वीज,पाणी यासारख्या पायाभूत सुविधामध्ये सुधारणा करण्यात येणार आहे.तसेच कुशल मनुष्यबळ उपलब्ध करण्यासाठी तरुणांना प्रशिक्षणही देण्यात येणार आहे.
२०२४ मध्ये झालेल्या गुंतवणूक परिषदेत २५० उद्योगांकडून १५ हजार कोटीचे गुंतवणुक सामंजस्य करार झाले होते.मात्र यंदा मोठ्या उद्योगापेक्षा जिल्ह्यातील सूक्ष्म,लघू आणि मध्यम उद्योगांना प्रोत्साहन देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्यामुळे गुंतवणूक कमी झाल्याची माहिती कोकण विभागाच्या सहसंचालक विजू सिरसाठ यांनी दिली. जिल्हास्तरावर गुंतवणुक आकर्षित करणे,गुंतवणुकदार आणि व्यवसायांना एकत्रित व्यासपीठ उपलब्ध करुन देणे आणि जिल्ह्याला केंद्रबिंदु मानून विकासाला चालना देणे,हा या परिषदेचा उद्देश असल्याचे सिरसाठ यांनी सांगितले.
पालघर जिल्ह्यात आर्थिक गुंतवणुक आकर्षित करण्यासाठी करण्यात येत असलेल्या सामंजस्य कराराच्या माध्यमातून गुंतवणुकदारांना उद्योग विभाग,जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून आवश्यक परवानग्या व शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी प्रत्येक टप्यावर सहकार्य केले जाते.महा-डिफेन्स एक्स्पो, राज्यस्तरीय निर्यात पुरस्कार, इग्नाईट महाराष्ट्र,समूह विकास योजना,मुख्यमंत्री रोजगार निर्मीती योजना,उद्योग धोरण इ.विषयांवर परिषदेत सहभागी उद्योजक,नव उद्यमी,बँकांचे प्रतिनिधी याना मार्गदर्शन करण्यात आले.
या परिषदेला जिल्हाधिकारी डॉ. इंदुरानी जाखड,उद्योग विभागाचे सहसंचालक विजू सिरसाठ,एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी उदय किसवे,टीमाचे अध्यक्ष वेलजी गोगरी,जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक उपेंद्र सांगळे यांच्यासह उद्योजक आणि इतर अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

