दीपक मोहिते,
विद्वेषाचे राजकारण,
फुले चित्रपट : सरकार गप्प का ?
छावा चित्रपटानंतर आता फुले चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे.” फुले, ” हा चित्रपट महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या समाजसुधारणेच्या संघर्षमय वाटचालीवर आधारित आहे.यामध्ये ” स्कॅम १९९२,” वेब सीरिज फेम प्रतिक गांधी महात्मा फुलेंच्या आणि अभिनेत्री पत्रलेखा ही सावित्रीबाई फुलेंच्या भूमिकेत आहे.राष्ट्रीय पुरस्कार विजेते अनंत महादेवन दिग्दर्शित ” फुले,” या चित्रपटावर ब्राह्मण महासंघाचे नेते आनंद दवे यांनी आक्षेप घेतला होता.या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये एक ब्राम्हण मुलगा सावित्रीबाईच्या अंगावर शेण फेकताना दाखवलं आहे.हा प्रकार दाखवण्यास आमचा विरोध नाही. मात्र फुले यांच्या शाळेला मदत करणारे ब्राम्हणच होते,हे या ट्रेलरमध्ये का दाखवण्यात आले नाही, असा दवे यांचा आक्षेप आहे. या घडामोडीनंतर आता चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. चित्रपट एकतर्फी नको, सर्वसमावेश असावा,अशी मागणी आनंद दवे यांनी केली होती.त्यानंतर आता २५ एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.चित्रपटाला विरोध होत असल्याने अनेक राजकीय नेत्यांनी यावर आपले मत व्यक्त केले आहे.वास्तविक या चित्रपटाला काही कारण नसताना विरोध करण्यात असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.त्याकाळात जे काही घडलं,त्याचे यथार्थ चित्रण करण्यात सिनेमाचे निर्माते यशस्वी झाले आहेत. काँग्रेसच्या खा.वर्षा गायकवाड यांनी एक्सच्या माध्यमातून व्यक्त होत या चित्रपटाबाबत सध्या सुरु असलेल्या वादावर भाष्य केले.
“सत्य लपवता लपून राहत नाही,”
सत्य प्रकाश आहे,त्याचा उदय होतोच..!
त्याकाळी ते क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या विरोधात कठोरपणे लढले.समाजात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्याची ताकद ठेवणाऱ्या फुले दांपत्यांच्या क्रांतिकारी विचारांविरुद्ध ते झगडले.फुले दांपत्यानं केलेलं अमूल्य कार्य हे काळाच्या पडद्याआड हरवून जावं,यासाठी त्यांनी इतिहासातील सत्य सांगणाऱ्या ओळी खोडून काढण्याचा देखील अयशस्वी प्रयत्न केला. आणि आता पुन्हा एकदा तसंच लाजिरवाणे कृत्य ते करत आहेत.मानवतावादी व परिवर्तनवादी विचारांचा प्रसार आणि प्रचार करणाऱ्या फुले दांपत्यावर त्या कालखंडात झालेला अन्याय,अत्याचार एका चित्रपटात चित्रित करण्यात आला आहे,परंतु तो भाग चित्रपटातून वगळण्याची सक्ती केली जात आहे.का आणि कशासाठी?
एरवी विभाजनकारी, समाजा-समाजात द्वेष पसरवणारे चित्रपट कोणत्याही अडथळ्याविना प्रदर्शित केले जातात.तेथे सरकार काही कारवाई करताना दिसत नाही.उलट फुले दांपत्याच्या जीवनावर आधारित चित्रपटातील सत्य दर्शवणारे काही भाग वगळण्याच्या सूचना करण्यात येत आहेत. यावर सरकार गप्प का आहे ? सरकारला लाज वाटायला हवी..! असे ट्विट वर्षा गायकवाड यांनी केले आहे.

