दीपक मोहिते,
पालघर येथे शिंदे गटातर्फे लोक दरबाराचे आयोजन,
गेल्या महिन्यात पालकमंत्री गणेश नाईक यांनी जनता दरबार भरवल्यानंतर काल परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी लोकदरबार आयोजित केला होता.हा लोकदरबार म्हणजे भाजपवर शिंदे गटाकडून कुरघोडी करण्याचा हा प्रयत्न असल्याची चर्चा सर्वत्र सूरू झाली आहे.
या लोकदरबारात नागरिक, प्रशासन आणि शासन यांच्यात समन्वय साधून नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्यासाठी आम्ही लोकदरबार हा लोकाभिमुख उपक्रम सुरू केला आहे,असे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले.
या लोकदरबारात कु.सानिका घरत या विद्यार्थींनीस आज तत्काळ जात पडताळणी प्रमाणपत्र देण्यात आले.
नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी तसेच तक्रारी अर्जावर तात्काळ निर्णय घेण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हा नियोजन समिती सभागृह,पालघर येथे लोक दरबाराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी आ.विलास तरे,आ.रविंद्र फाटक,माजी आ.श्रीनिवास वनगा,माजी आ.मनिषाताई निमकर,परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे,पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील,अतिरिक्त जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगरे,सहा.जिल्हाधिकारी,सत्यम गांधी निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे,आदी मान्यवर उपस्थित होते.
परिवहनमंत्री प्रताप सरनाईक पुढे म्हणाले की,लोकदरबार कसा असावा,याचे हे उत्तम उदाहरण आहे. हा पहिला लोकदरबार आहे की,ज्यामध्ये तत्काळ ४०० हून अधिक तक्रारी आल्या.या सर्व समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे.परंतु मला अभिमान आहे की आज जो लोकदरबार भरवला त्यात कु.सानिका घरत या विद्यार्थींनीची येत्या १२ एप्रिल रोजी परिक्षा आहे आणि तिला जर जातपडताळणी प्रमाणपत्र मिळाले नसते तर ती परिक्षेस बसू शकली नसती.परंतु या लोकदरबारात तीला तात्काळ प्रमाणपत्र उपलब्ध करण्यात आले,याचा मला अभिमान आहे.
सरनाईक पुढे म्हणाले की,आमच्याकडे विविध शासकीय विभागातील कामे येत असतात आणि ती कामे करत असतांना त्याची व्याप्ती किती आहे,याची आम्हाला जाणीव असते.अधिकाऱ्यांना पण काही शासकीय बंधने असतात,पण लोकांची कामे थांबणार नाहीत,त्यांना न्याय कसा मिळेल,त्यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील असतो. त्यामुळे अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर कामे कशी मार्गी लागतील,याकडे लक्ष द्यावे.सर्वसामान्य जनतेला न्याय मिळाला पाहिजे,याची अधिकाऱ्यांनी जाणीव ठेवली पाहिजे.
या लोक दरबारामध्ये विविध शासकीय विभागातील टेबल्स लावण्यात आली होती.यावेळी लोकदरबारास नागरिकांचा उत्फूर्त प्रतिसाद लाभला. सुरुवातीला नागरिकांना टोकन वाटप करण्यात आले.त्यानंतर परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी नागरिकांच्या तक्रारीचे निवारण करून संबंधित विभागाकडे सदरचा तक्रारी अर्ज पाठवण्यात आले.
पालघर जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्या ऐकून त्या सोडवण्यासाठी लोक दरबाराचे आयोजित करण्यात आले होते.या लोक दरबारात ३९३ हून अधिक व्यक्तीगत समस्येसह,सार्वजनिक तक्रारी विविध नागरिकांकडून मांडण्यात आल्या.उपस्थित अधिकाऱ्यांनी अनेक समस्यांना समाधानकारक उत्तरे देऊन सोडण्याचा प्रयत्न केला.तसेच काही तक्रारी संदर्भात विशिष्ट मुदत ठरवून देऊन त्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे निर्देश मंत्री सरनाईक यांनी अधिकाऱ्यांना दिले.
या लोकदरबारा नंतर परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी सुर्यानगर ता.डहाणू येथील मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे मुंबई महानगर क्षेत्रातील पश्चित उपप्रदेशातील मिरा-भाईंदर व वसई-विरार महानगरपालिका तसेच याच परिसरातील ४४ गावाच्या सुर्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेची पाहणी केली.
सुर्या प्रकल्पाच्या टप्पा-१ वसई-विरार महानगरपालिकेस नोव्हें.२०२३ पासून पाणी पुरवठा कार्यान्वित करण्यात आला असून त्यानुसार वसई-विरार महानगरपालिकेस १७० द.ल.लि.पाणी पुरवठा सुरु आहे.तसेच मिरा-भाईंदर महानगरपालिकेला पाणी पुरवठा करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कामाच्या सद्यस्थितीचा आढावा यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतला. मिरा-भाईंदर महानगरपालिकेस लवकरच पाणी पुरवठा सुरु करण्याचे नियोजन आहे,असे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच
पालघर येथे लवकरच नवे प्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू करण्यात येईल अशी घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली.आज प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या जागेची पाहणी केली.तसेच पालघर आगाराची यावेळी पाहणी करून पालघर विभागातील ८ आगारांना प्रत्येकी ५ नवीन लालपरी बसेस देण्यात येत असल्याची माहिती परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.या लोकदरबारात भाजपचे खासदार,आमदार व पदाधिकाऱ्यांची अनुपस्थिती बरंच काही सांगून गेली,.

