डाकिवली- केळठण रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा शिवसेनेचा आरोप,
तालुक्यात वर्दळीचा डाकिवली- केळठण या रस्त्याचे काम सुरू असून या कामात नियमानुसार साहित्य वापरले जात नाही. त्यामुळे रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप शिवसेना ( शिंदे गटाचे ) उपजिल्हाप्रमुख सुनील पाटील यांनी केला आहे.
या रस्त्याचे काम करणाऱ्या बोगस ठेकेदार व त्याला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा,अशी मागणी एका निवेदनाद्वारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली आहे.
डाकीवली-केळठण हा १२ कि.मी.लांबीचा रस्ता असून त्यासाठी भिवंडी ग्रामीणचे आ.शांताराम मोरे यांच्या फंडातून साडेचार कोटीचा निधी मंजूर झाला असून हे काम ओवी कंट्रक्शन या ठेकेदार कंपनीला देण्यात आले आहे.परंतु ठेकेदार एजन्सीने या कामात नित्कृष्ट साहित्य वापरले आहे.हा ठेकेदार गुणवत्तेचेही तडजोड करून काम करीत असून सदर कामात अधिकारी ठेकेदाराला पाठीशी घालत असल्याचा आरोप करून या कामाची सखोल चौकशी करून अधिकारी व ठेकेदार यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी सुनील पाटील यांनी केली आहे.
सद्यस्थितीत काम बंद असून येत्या दोन दिवसात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारांच्या निगराणीखाली अंदाजपत्रकाप्रमाणे काम सुरू होईल.
– संजय डोंगरे, उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग वाडा,

