नाशिक प्रतिनिधी
हंडा मोर्चा आंदोलनानंतर आठ पाड्यांवर टॅंकरने पाणीपुरवठा सुरू,
नाशिक जिल्ह्यातील धार्मिक स्थळ आणि पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या पावसाळ्यात निसर्गाच्या वरदानाने बहरणाऱ्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील जनता सध्या पाणीटंचाईने हैराण झाली आहे.आदिवासी वस्ती असलेल्या त्र्यंबक तालुक्यातील वाड्या व पाड्यावरील आदिवासींना हंडाभर पाण्यासाठी प्रचंड पायीपीट करावी लागत आहे. वारंवार मागणी करूनही पाणीपुरवठा जलजीवन मिशन योजना कार्यान्वित होण्यास विलंब तसेच या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्यामुळे वाड्या व पाड्यांवर तातडीने टॅंकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात यावा,या मागणीसाठी एल्गार कष्टकरी संघटना आदिवासी भागात आंदोलन करीत आहे. काल त्र्यंबक तालुक्यातील पाणीप्रश्नाबाबत त्र्यंबक पंचायत समितीवर आदिवासी महिलांनी हंडा मोर्चा काढून तीव्र आंदोलन केले आणि पंचायत समिती कार्यालयासमोर धरणे धरले. रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या आंदोलनानंतर त्र्यंबक पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी धावपळ करून आठ टंचाईग्रस्त पाड्यांवर टँकरने पाणीपुरवठा सुरू केला. त्यानंतर आंदोलकांनी पंचायत समिती कार्यालय सोडले.दरम्यान दिवसभर पंचायत समिती समोर ठाण मांडून बसलेल्या आंदोलकांनी पंचायत समिती कार्यालयाच्या आवारातच चुली पेटवून स्वयंपाक बनवला.

