जव्हार प्रतिनिधी,
देहरे आश्रमशाळा येथे करियर मार्गदर्शन शिबीर संपन्न,
विद्यार्थ्यांनी दहावी आणि बारावी नंतर कोणत्या दिशेने वाटचाल करावी,कोणते करिअर निवडावे,स्पर्धा परीक्षा,कौशल्याधारित शिक्षण,तांत्रिक अभ्यासक्रम, वैद्यकीय क्षेत्र,परदेशी शिक्षण अशा विविध संधींबाबत योग्य माहिती मिळावी,या उद्देशाने शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा,देहरे ( जव्हार ) येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, जव्हार अंतर्गत “ दहावी व बारावीनंतर काय?” या विषयावर करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवर मार्गदर्शकांनी विद्यार्थ्यांना समोरासमोर मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे किशोर मानभाव ( पोलीस निरीक्षक, जव्हार ) यांनी पोलीस भरती,विविध स्पर्धा परीक्षांबाबत सविस्तर माहिती दिली.त्यांनी सायबर गुन्हेगारी व ‘अपघातमुक्त गाव’ या संकल्पनांचे प्रबोधन करत सामाजिक सजगतेचा संदेश दिला.मनोज कामडी ( तालुका व्यवस्थापक,पेसा – पंचायत समिती,जव्हार ) यांनी उच्च शिक्षण,कौशल्य विकास, परदेशी शिक्षणातील संधी, शिष्यवृत्ती योजना यावर मोलाचे मार्गदर्शन केले. “स्वतःवर विश्वास ठेवा, व्यसनांपासून दूर रहा आणि मोठे स्वप्न पाहा,” असा प संदेश विद्यार्थ्यांना दिला.तुकाराम कनोजा (सहाय्यक प्राध्यापक, मातोश्री पॅरामेडिकल कॉलेज) यांनी मेडिकल क्षेत्रातील विविध कोर्सेस व करिअर पर्यायांची माहिती दिली.श्रीमती कोमल चौधरी (स्टेम प्रोजेक्ट ऑफिसर,आरोहन संस्था ) यांनी “स्मार्ट वर्क आणि स्मार्ट गोल,” या संकल्पनेवर प्रभावी संवाद साधला.राकेश कोळमकर व कल्पेश वराडे (सहाय्यक अधिव्याख्याता व आयटीआय निर्देशक, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जव्हार) यांनी विविध तांत्रिक कोर्सेस, कौशल्य विकास योजनांबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण केली.कालन सर (ओझर आश्रमशाळा ) यांनी विद्यार्थ्यांनी आपली स्वतःची आवड व क्षमता ओळखून निर्णय घेण्याचा सल्ला दिला.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक शशिकांत आवारीयांनी केले. सूत्रसंचालन देवराम दळवी व वांगड यांनी पार पाडले. फसाळे यांनी मान्यवरांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली.शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि प्रकल्प कार्यालयाचा सक्रिय सहभाग लाभला.विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभागी होत शिबिरातून भरपूर माहिती घेतली.अशा उपक्रमामुळे आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळते,असे मत पालकवर्ग व ग्रामस्थांनी व्यक्त केले.

