सुरेश वैद्य,पालघर,
माजी मुख्य कार्य.अधिकारी भानुदास पालवे यांचा निरोप समारंभ संपन्न,
काल पालघर जिल्हा परिषदेच्या जननायक बिरसा मुंडा सभागृह,येथे जिल्हा परिषदेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे यांच्या सन्मानार्थ निरोप समारंभ तसेच नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांच्या स्वागत समारंभाचा भव्य सोहळा संपन्न झाला.
कार्यक्रमाला माजी जिल्हाधिकारी गोविंद बोडके, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे,प्रकल्प संचालक डॉ.रूपाली सातपुते,उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर जगताप,इजाज अहमद शरीख मसलत,मुख्य लेखा व वित्त अधिकारी धनराज पांडे माजी जिल्हा परिषद सदस्य नीता पाटील,विनया पाटील,काशिनाथ चौधरी,हबीब शेख,मंगेश भोईर,तसेच जिल्हा परिषदेचे सर्व विभाग प्रमुख,गटविकास अधिकारी,जिल्हा परिषद कर्मचारी आणि अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.भानुदास पालवे यांच्या पत्नी सुनीता पालवे या देखील समारंभाला उपस्थित होत्या.
यावेळी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी भानुदास पालवे यांच्या काम करण्याच्या शैलीबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या.त्यांच्या प्रशासकीय कुशलतेमुळे जिल्ह्यातील विविध योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे झाली.मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी जिल्हा परिषदेच्या सुसज्ज इमारतीबद्दल समाधान व्यक्त करून झालेल्या विकासकामांबद्दल त्यांना तसेच पालकमंत्री महोदयांच्या संकल्पनेतील प्लास्टिकमुक्त जिल्हा साकारण्यासाठी वाटचाल करुया,असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
माजी जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी पालवे यांनी प्रशासनामध्ये केलेल्या कामाचे कौतुक केले.त्यांच्यामुळे जिल्ह्यात अनेक महत्त्वाची कामे मार्गी लावता आली असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेतील शिस्तप्रिय वातावरण आणि कर्मचाऱ्यांच्या कार्यपद्धतीमध्ये त्यांनी घडवलेल्या सकारात्मक बदलांची प्रशंसा केली. ” प्रशासकीय अधिकारी कसा असावा,तर तो भानुदास पालवे यांच्यासारखा,” असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
यावेळी भानुदास पालवे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यामध्ये त्यांनी अडीच वर्षांच्या पालघर जिल्हा परिषद कार्यकाळातील अनुभव सांगितले.तसेच आपल्या आधीच्या प्रशासकीय सेवेतल्या अनुभवांचीही आठवण काढली.त्यांनी सहकाऱ्यांचे आणि कर्मचाऱ्यांचे आभार मानले आणि पुढील वाटचालीबाबत आपल्या मनोगतातून विचार मांडले.
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे यांनी प्रास्ताविक करताना पालवे सरांच्या कार्यकाळातील महत्त्वपूर्ण योजनांचा आढावा घेतला.त्याचप्रमाणे माजी जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ चौधरी,भावना विचारे,जयेंद्र दुबळा,गट विकास अधिकारी,यांनीही आपल्या भावना व्यक्त करून त्यांचा सन्मान केला.
यावेळी भानुदास पालवे आणि मनोज रानडे या दोघांचाही विशेष सत्कार करण्यात आला.उपस्थित मान्यवरांनी भानुदास पालवे यांचा सन्मान करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. नव्याने पदभार स्विकारलेल्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांच्या कार्यकाळातही जिल्हा परिषदेच्या विकासकामांना गतिमानता येईल,असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

