वसंत भोईर,वाडा
वाड्यात आजपासून ” जिवंत सातबारा,” मोहीम राबवण्यास सुरवात,
शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असणाऱ्या ७/१२ उताऱ्यावरील मयत खातेदारांची नावे कमी करून त्यावर त्यांच्या वारसांची नावे लागण्यासाठी आजपासून वाडा तालुक्यात जिवंत सातबारा,ही मोहीम राबवण्यात येत आहे.घोणसई येथे आज सकाळी चावडी वाचन करण्यात आले.
महाराष्ट्र शासनाने शासन घेतलेल्या निर्णयानुसार ही मोहीम राज्यभर राबवण्याबाबत सूचित करण्यात आले आहे.त्या अनुषंगाने वाडा तालुक्यातील सर्व गावात आजपासून या मोहिमेला सुरुवात झाली आहे. वारस नोंदणी प्रक्रियेत बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो.काहीवेळा कोर्ट केसेस सुद्धा होतात आणि शेतकऱ्यांना नाहक मनःस्ताप सहन करावा लागतो.या मोहिमेच्या निमित्ताने हा प्रकार थांबणार असून शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
जिवंत सातबारा या मोहीमे अंतर्गत १ ते ५ एप्रिल पर्यंत चावडी निहाय मयत खातेदारांची यादी तयार करून त्या यादीचे चावडी वाचन केले जाईल,त्यानंतर ६ ते २० एप्रिलपर्यंत वारसांना आवश्यक कागदपत्रे घेऊन अर्ज करावा लागेल.२१ एप्रिल ते १० मे पर्यंत ई- फेरफार प्रणाली अंतर्गत सातबारा उताऱ्यावर वारसांची नोंद घेतली जाईल.या मोहिमेत अर्ज सादर करताना शेतकऱ्यांना मयत व्यक्तीचा मृत्यू दाखला,रहिवासी पुरावा,वारस प्रमाणपत्र किंवा स्वयंघोषणापत्र प्रतिज्ञापत्र, पोलीस पाटील,सरपंच किंवा ग्रामसेवक यांचा दाखला,सर्व वारसांची माहिती देणे आवश्यक राहील.
सदर मोहीम वाडा तालुक्यात तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली मेट मंडळात मेटचे मंडळ अधिकारी हेमंत आक्रेकर यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात येत असुन आज घोणसई येथील ग्रामपंचायत कार्यालयात या मोहिमेअंतर्गत ७/१२ चे वाचन मेट तलाठी सजेचे ग्राम महसूल अधिकारी अनंत मडके यांनी केले.

