वसंत भोईर,वाडा
वाडा तालुका विकासा पासून कोसो मैल दूर,
वाडा तालुका ग्रामीण व अतिदुर्गम भाग असलेला तालुका असून,विकासाच्या बाबतीत गेली अनेक वर्षे राजकारण्यांकडून दुर्लक्षित राहिला आहे.शासकीय योजना राबवल्या जातात,पण त्या योजनेतील त्रुटीमुळे त्यांचा लाभ खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना मिळत नाही. आजवर ग्रामीण भागातील स्थानिक भूमिपुत्रानी अनेक आंदोलने केली.अर्ज विनंती झाल्या,मात्र वीज,पाणी, सिंचन प्रकल्प,बेरोजगारी या ज्वलंत समस्या सुटलेल्या नाहीत.तालुक्याचा विकास होणार तरी कधी ? असा सवाल नागरिक विचारत आहेत.
वाड्यात १९९२ पासून औद्योगिक उद्योगधंदे व कारखानदारी सुरू झाली.मात्र कारखान्यासाठी आवश्यक असलेली वीज स्वस्त व अधिक विद्युतभाराची मिळत नसल्याने येथील अनेक कारखाने अल्पावाधीत परराज्यात गेले.त्यामुळे ग्रामीण भागातील उद्योग बंद पडले.बेकारी वाढली,आर्थिक व्यवहारात मंदी आली. शासनाला या बाबींची दखल घेऊन मार्ग काढायला लावणारा लोकप्रतिनिधी या तालुक्याला लाभला नसल्याने कारखानदारी आली पण तिचा लाभ स्थानिकांना मिळू शकला नाही.
खरीप हंगामात होणारी पिके म्हणजे भात,नाचणी,वरी पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेली ही पिके घेताना शेतकऱ्यांना खूप कष्ट करावे लागतात.मजुरांची कमतरता, वाढते मजुरीचे दर,ट्रॅक्टर,बी – बियाणांचे वाढलेले दर यामुळे खरिपाची शेती उत्पन्नापेक्षा खर्च जास्त अशी झाली आहे. पावसाळ्यानंतर शेती कोरडे असते,यासाठी वाड्यात शेतकरी सिंचन प्रकल्प योजना राबवण्याची मागणी करीत आहेत पाच नद्यांमधून पाणी अडवले तर सिंचनावर आधारित विविध पिके घेता येतील.आजही नदीकाठावरील शेतकरी कलिंगड,टरबूज, भाजीपाला पिकवत आहेत. रस्ते व विजेची समस्या सुटली तर औद्योगिक विकास होईल. उद्योगांना चालना मिळेल, सिंचन प्रकल्प झाले तर शेतीला सुगीचे दिवस येतील, उद्योगामुळे रोजगार उपलब्ध होईल व सिंचन प्रकल्प झाले तर दुहेरी पिके व पाणी समस्या दूर होईल.मात्र या समस्यांकडे लोकप्रतिनिधी लक्ष देत नसल्याने वाडा तालुका आजच्या घडीला विकासापासून कोसो दूर आहे.

