दीपक मोहिते,
वसई महसूल विभागाची वेगवान मोहीम…
” जिवंत सातबारा मोहीमे,”तून ७/१२ उताऱ्यावरील मयतांची नावे कमी होणार अन् वारसांची नावे लागणार,
सातबाऱ्यावरील मयताच्या नावांमुळे खरेदी-विक्री व्यवहार,कर्ज प्रकरणासह अनेक अडचणी येतात. सातबाऱ्यावरील ही अडचण दूर करण्यासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी १०० दिवसाच्या कृती कार्यक्रम आराखड्याअंतर्गत १ एप्रिलपासून “जिवंत सातबारा मोहीम,” राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यानुसार वसई तालुक्यात १ ते ५ एप्रिल दरम्यान ग्राम महसूल अधिकारी ( तलाठी ) त्यांच्या सजा अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये चावडी वाचन करून न्यायप्रविष्ट प्रकरणे सोडून गावनिहाय मयत खातेदारांची यादी तयार करतील.
६ ते २० एप्रिल दरम्यान वारसासंबंधी आवश्यक कागदपत्रे ( मृत्यू दाखला, वारसाबाबत सत्य प्रतिज्ञालेख किंवा स्वयं घोषणापत्र,पोलिस पाटील किंवा सरपंच ग्रामसेवक यांचा दाखला,सर्व वारसांची नावे,वय,पत्ते व दूरध्वनी किंवा भ्रमणध्वनी क्रमांक,रहिवासी पुरावा,अशी कागदपत्रे ग्राम महसूल अधिकारी ( तलाठी ) यांच्याकडे सादर करावी लागणार आहेत.
ग्राम महसूल अधिकारी ( तलाठी ) यांनी स्थानिक चौकशी करुन मंडळाधिकाऱ्यांमार्फत वारस ठराव ई- फेरफार प्रणालीमध्ये मंजूर करणार आहेत.
२१ एप्रिल ते १० मे दरम्यान तलाठ्यांनी ई- फेरफार प्रणालीत वारस फेरफार तयार करणार आहेत.
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या विहित कार्यपद्धतीचा अवलंब करून मंडळ अधिकारी संबंधितांच्या वारस फेरफारवर निर्णय घेऊन त्यानुसार ७/१२ उताऱ्यावर दुरुस्त करणार आहेत.यासाठी कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही.
वसई तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा ही विनंती !
*तहसीलदार वसई आणि उपविभागीय अधिकारी वसई*

