अनंत भोईर,पालघर,
मुख्य कार्य. अधिकारी मनोज रानडे यांनी साधला पत्रकारांसोबत संवाद,
पालघर जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी आज पत्रकारांसोबत औपचारिक परिचय करून घेतला.यावेळी प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधी उपस्थित होते.मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रत्येक पत्रकारांचा परिचय करून घेतला आणि त्यांच्यासोबत सुसंवाद साधला.
मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी जिल्ह्यात काम करताना कुपोषण, आरोग्य,शिक्षण आणि पाणीपुरवठा यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर भर दिला जाईल, ” जिल्ह्यातील कुपोषणाचे प्रमाण, शिक्षणाच्या सुविधा आणि पाणीटंचाई यावर विशेष लक्ष दिले जाईल.त्यासाठी परिणामकारक उपाययोजना केल्या जातील.” असे स्पष्ट केले.
संवादा दरम्यान पत्रकारांनी जिल्ह्यातील विविध समस्यांवर सखोल चर्चा केली.त्यांनी कुपोषण,बालमृत्यू,मातामृत्यू, स्थलांतर,बोगस डॉक्टरांची समस्या,घरकुल योजना, जलजीवन मिशन,शिक्षण व्यवस्था,आरोग्य सुविधा आणि पाणीटंचाई यांसारख्या विषयांवर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले.
या सर्व मुद्द्यांवर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पत्रकारांच्या सूचना आणि तक्रारींची नोंद घेतली.तसेच ” जिल्ह्यातील कोणत्याही विभागात गैरप्रकार आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल. पत्रकारांनी दिलेल्या सूचनांचे गांभीर्याने परीक्षण करून आवश्यक त्या सुधारणा केल्या जातील. प्रशासन आणि प्रसारमाध्यमांमध्ये उत्तम समन्वय राहील याची काळजी घेतली जाईल.” असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
मनोज रानडे यांनी जिल्ह्यातील प्रशासन अधिक गतिमान आणि पारदर्शक करण्याच्या दृष्टीने सर्व संबंधित घटकांशी संवाद साधत राहण्याचे आश्वासन दिले. या बैठकीत जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासावर सकारात्मक चर्चा झाली.

