संजय नेवे,विक्रमगड
विक्रमगड येथे जनसभेचे आयोजन,
शेतकरी व कष्टकरी संघर्ष समिती तर्फे आपल्या विविध मागण्यासाठी विक्रमगड येथे जनसभेचे आयोजन करण्यात आले होते.
विक्रमगड येथील आमराई गार्डन येथे संपन्न झालेल्या या जनसभेस कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील,गोदुताई परुळेकर मंचचे कॉ.राजू परांजपे,आदिवासी भूमी सेना एकता परिषदेचे परशुराम चावरे,दत्ता सांबरे,आदिवासी संयुक्त हक्क संरक्षण समिती पालघर जिल्हा समितीचे सचिव राहुल धूम,भालचंद्र मोरघा,यादव गभाले,कुणबी सेनेचे अविनाश पाटील,रणधीर पाटील,शूल झलकारी कातकरी संघटनेचे रमेश सावरा,शेतकरी कष्टकरी संघर्ष समितीचे दिनेश घाटाळ व संघर्ष समितीचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पुढील मागण्याबाबत विचारविनिमय करून पाठपुरावा करण्याचे ठरवण्यात आले.
सिन्नर,घोटी,जव्हार,मोखाडा, विक्रमगड,मनोर व पालघर रस्त्याच्या भूसंपादनाआधी बेकायदेशीर सुरू केलेले काम त्वरित थांबवा व समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला द्या,विक्रमगड तालुक्यातील सर्व नद्यांवर बंधारे घालून बारमाही सिंचन व्यवस्था निर्माण करून शेती वाचवा व आदिवासी रोजगारासाठी होणारे स्थलांतर थांबवा,शेतकऱ्यांच्या उपजीविकेचे एकमेव साधन असणारा भाग वाचवण्यासाठी रोजगार हमीतून शेतीची लागवड करून द्या व भाताला क्विंटल मागे ५ हजार रु.हमीभाव द्या, डहाणू व्हाया विक्रमगड,वाडा ते दिवा या प्रलंबित रेल्वे मार्गाची मागणी पूर्ण करा व ग्रामीण जनतेला न्याय द्या, विक्रमगड तालुक्याचे निर्मिती होऊन २५ वर्ष पूर्ण झाली तरी तालुक्यात निम्मी कार्यालय न आल्यामुळे जनतेची गैरसोय तातडीने दुर करा व भ्रष्ट अधिकाऱ्यांची हकालपट्टी करा,१३७ कोटी खर्च करून एक वर्षात उखडलेला पाली, विक्रमगड,तलवाडा रस्ता वाहतुकीलायक त्वरित करून भूसंपादन करा व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या,पालघर जिल्ह्याची निर्मितीनंतर ७५ कोटी रु.खर्च करून मनोर येथे शासनातर्फे बांधण्यात आलेले ट्रामा हॉस्पिटल त्वरित सुरू करा.
संघर्ष समितीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात उल्लेख केल्याप्रमाणे पालघर जिल्ह्यात विविध प्रदूषणकारी कारखाने व प्रकल्प येऊ घातले आहेत. वाढवण बंदराच्या निर्मिती सोबत चौपदरी रस्ते,उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्या,गॅस पाईप लाईन इत्यादी प्रकल्पासाठी शेतकऱ्यांना विश्वासात न घेता उत्खनन व सर्वे सुरू आहे. त्यासाठी शासकीय नियम व कायदे धाब्यावर बसवण्यात येत आहेत.वरील उपक्रमासाठी हजारो हेक्टर जमीन व शेतकरी बाधित होणार आहेत, तसेच तालुक्यातील मुख्य रस्त्यांची झालेली दुरावस्था आदी विषयाबाबत जनसभेत सखोल विचार विनिमय करण्यात आला.

