दीपक मोहिते,
प्रचंड उकाड्यामुळे जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्याकडे पर्यटकांची पाठ,
वाढत्या उकाड्यामुळे पर्यटकांनी यंदा जिल्ह्याच्या पर्यटनस्थळाकडे पाठ फिरवली आहे.त्यामुळे समुद्रकिनारी असलेले रिसॉर्टस व त्यावर अवलंबून असलेले अनेक व्यवसाय धायकुतीला आले आहेत.जिल्ह्यात रिसॉर्टस व रिक्षाव्यवसायात स्थानिक भूमिपुत्र बऱ्यापैकी अर्थाजन करत असतात.पण यंदा पर्यटकांची संख्या रोडावल्यामुळे चिंतेचे वातावरण पसरले आहे.
मुलांच्या परीक्षा आटोपल्या की पालघर,मुंबई व ठाणे जिल्ह्यातील पर्यटक आपल्या मुलाबाळांसह एक किंवा दोन दिवसीय पिकनिकची मौजमजा लुटण्यासाठी जिल्ह्याच्या समुद्रकिनारी येत असतात.अर्नाळा,कळंब, राजोडी,नवापूर,केळवे,चिंचणी,डहाणू व बोर्डी हे समुद्रकिनारे पर्यटकांसाठी खास आकर्षणे आहेत.या समुद्रकिनारी असलेले रिसॉर्टस हे खिश्याला परवडणारे असल्यामुळे एप्रिल,मे व जून महिन्यात येथील रिसॉर्टस हाऊसफुल्ल होत असतात.या तीन महिन्यात रिसॉर्टस व्यवसायिक कोट्यवधी रु.ची उलाढाल होत असते.तसेच या व्यवसायावर अवलंबून असलेल्या अनेक व्यवसायात स्थानिक भूमीपुत्रांनाही चांगल्यापैकी रोजगार उपलब्ध होत असतो.मात्र यंदा जिल्ह्यात उकाड्याने उच्चांक गाठल्यामुळे पर्यटकानी सध्या या पर्यटनस्थळाकडे पाठ फिरवली आहे.सर्वसाधारणपणे मार्च महिन्याच्या अखेरीस या सर्व समुद्रकिनारी पर्यटकांची वर्दळ सुरू होत असते.पण यंदा समुद्रकिनारे अद्याप ओस पडलेले पाहायला मिळत आहेत.

