अनिल देशपांडे,वसई,
तुंगारेश्वर अभयारण्यात लागणाऱ्या आगीची चौकशी करून कारवाई करा,
वसई तालुक्याच्या पूर्वेस तुंगारेश्वर अभयारण्य हे निसर्गप्रेमी,जंगल भटके आणि भाविकांसाठी एक महत्त्वाचे ठिकाण आहे.२४ ऑक्टो.२००३ रोजी या ८५ हजार ७०० चौरस कि.मी.क्षेत्राला अभयारण्याचा दर्जा मिळाला.या अभयारण्यात साग,शिसव, खैर,ऐन,आवळा,हिरडा, बेहडा यांसारख्या वनस्पती आढळतात.तसेच,येथे बिबटे, रानडुक्कर,ससे,भेकर, मकाक,लंगूर यांसारखे प्राणी आणि १५० हून अधिक प्रकारचे पक्षी आढळतात.
परंतु,अलिकडच्या काळात या अभयारण्यात तसेच वसईतील महामार्गालगतच्या जंगलात वारंवार आगी लागण्याचे व लावण्याचे प्रकार घडत आहेत. या घटनांमुळे येथील पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणावर ऱ्हास होत आहे. वनसंपदा,जैवविविधता आणि अभयारण्यात वास्तव्यास असलेल्या वन्य प्राण्यांच्या जीवनाला गंभीर धोका निर्माण झाला आहे.
तरी,या आगीमागील कारणांचा शोध घेऊन दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी.तसेच,भविष्यात अशा घटनांना आळा घालण्यासाठी प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्यात.अशी मागणी आम आदमी पार्टीचे पालघर जिल्हाध्यक्ष जॉन परेरा यांनी राज्याचे वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक,वन विभागाचे सचिव,व स्थानिक आ.स्नेहाताई दुबे पंडित यांना पत्र देऊन केली आहे.

