शुभम सावंत,विरार,
जनता दरबारला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पण पालकमंत्र्यांनी अवघ्या दीड तासात गुंडाळला…
दोन दिवसांपूर्वी आयोजित करण्यात आलेल्या जनता दरबारला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.जिल्ह्याच्या अनेक तालुक्यातील ग्रामस्थ आपल्या समस्या,अडचणी व प्रश्न घेऊन आले होते. त्यासाठी त्याना चांगलीच पदरमोड करावी लागली.पण या जनता दरबारामध्ये किती कामकाज झाले,याचा लेखाजोगा तपासला तर हा जनता दरबार केवळ देखावा होता.
आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष जॉन परेरा यांना या जनता दरबाराचा अत्यंत वाईट अनुभव आल्याचे news 27 च्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.ते म्हणाले, महावितरण कंपनीला स्वीचींग स्टेशनसाठी विरार पश्चिम भागात जमीन हवी होती, त्यासाठी त्यांनी तहसीलदार यांच्याकडे रीतसर मागणी केली होती.वीज ग्राहक संघटनेच्या माध्यमातून आम्हीही महावितरण कंपनीकडे केली आहे. त्यासाठी आम्ही तहसीलदाराकडून पत्र घेऊन सत्पाळा ग्रामपंचायतकडे सादर केले.त्यानुसार सत्पाळा ग्रामपंचायतीकडून ठराव मंजूर करून घेतला.ग्रामपंचायत
परिक्षेत्रात एकता नगर या परिसराला लागून जागा आहे. त्या जागेची मागणी आम्ही जिल्हाधिकारी यांच्याकडे केली.महावितरण कंपनीने सुद्धा तसे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिले.परंतु सदर जागा खार जमीन आहे, असे सांगून ती नाकारण्यात आली.ज्या ठिकाणी अनधिकृतपणे अतिक्रमण करून झोपड्या वाढत आहेत. त्या ठिकाणी शासकीय कामासाठी जागा उपलब्ध करून देणे,हे जिल्हाधिकाऱ्यांचे प्रथम कर्तव्य आहे.परंतु त्यांनी ते कर्तव्य पार पाडले नाही,माझा शासनाला प्रश्न आहे की विरार ते नालासोपारा पश्चिमेस रेल्वेचे यार्ड खार जमिनीमध्येच उभारण्यात आले आहे.शेकडो हेक्टर खार जमिनीमध्ये मातीभराव करून तेथे यार्ड उभारण्यात आले.मग येथे केवळ एक एकर जागा हवी आहे आणि ती जागा जिल्हाधिकारी का नाकारता आहेत ? सदर प्रश्न मी जनता दरबारात घेऊन गेलो होतो.दुर्दैवाने जिल्हा प्रशासनाने हा जनता दरबार दीड तासांमध्ये गुंडाळला.माझा क्रमांक ६०२ होता.फक्त माझ्याकडून निवेदन घेतले,जे मी अगोदरच शासनास पाठवले होते.मग प्रश्न असा पडतो की आमची गाऱ्हाणी आम्ही मांडायची तरी कुठे ? जिल्हाधिकारी व आमचे पालक असलेले पालकमंत्री जर आम्हाला न्याय देऊ शकत नसतील,तर असे जनता दरबार हे केवळ नागरिकांच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी आयोजित करण्यात येतात,असा आम्हा नागरीकांचा समज झाल्यास ते चुकीचे नाही,असंच म्हणावे लागेल.

