राजू वाघ,मुंबई
गारगाई प्रकल्प व भांडुप जलशुद्धीकरण केंद्र मुंबईसाठी महत्त्वाचे,
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाल विधान भवन,मुंबई येथे ” गारगाई धरण प्रकल्प,” यासंदर्भात आढावा बैठक आणि मौजे भांडूप,मुंबई येथील जलशुद्धीकरण केंद्राच्या बांधकामासाठी पर्यावरण संवेदनशील क्षेत्र संनियंत्रण समितीच्या मान्यतेसाठी बैठक पार पडली.या बैठकीमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांनी संबंधित अधिकाऱ्यांना महत्त्वाचे निर्देश दिले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की,गारगाई प्रकल्प मुंबईच्या पाणीपुरवठ्यासाठी आवश्यक आहे. या प्रकल्पातून ४०० दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध होणार आहे. यामुळे पुढील ५० वर्षे शहर व उपनगरासाठी पाणी उपलब्धता निश्चित होणार आहे. उगदा गावाजवळ ( वाडा ) हा प्रकल्प उभारण्यात येत असून या परिसरातील सहा गावांचे पुनर्वसन करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका व वन विभागाने पंधरा दिवसात प्रस्ताव सादर करावा. या गावांचे पुनर्वसन करताना नियमाप्रमाणे जमिनीचा मोबदला देणे व रोजगार संदर्भातील अटींची पूर्तता करण्यात यावी. उगदा गावाजवळ ४०० हेक्टर जमिनीवर या गावांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. त्यासंदर्भात महाराष्ट्र वन विकास मंडळाकडे यासंदर्भात पाठपुरावा करावा,असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
पुनर्वसनानंतर येथे मुंबई नजिकचे सर्वात मोठे वाईल्ड लाईफ सेंच्युरी होणार आहे. यामुळे नवीन रस्ताही तयार होईल.येथील स्थानिकांना त्याचा फायदा होणार असल्याचे यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की,भांडुप येथे दोन हजार दशलक्ष लिटर क्षमतेच्या जलशुद्धीकरण प्रकल्पामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या प्रकल्पाचे कामही तातडीने पूर्ण करण्यासंदर्भातील कार्यवाहीस गती द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
या बैठकीला मंत्री गणेश नाईक, वन विभागाचे अप्पर मुख्य सचिव, मित्रा संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त, प्रधान मुख्य वन संरक्षक (वन्य जीव) व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

