वसंत भोईर,वाडा
टायर कंपन्यांनी घातलाय वाड्याला विळखा,
तालुक्यात ७० टायर कंपन्यामुळे वाड्याच्या नागरिकांचा जीव गुदमरत आहे.बहुसंख्य कंपन्या या शासनाच्या नियमांचे उल्लंघन करून सुरू असल्याचे उघड झाले आहे.यातील ५२ टायर कंपन्या दिवस-रात्र काळाकुट्ट प्रदूषणकारी धूर ओकत आहेत.त्यांच्या त्रासाने येथील नागरिकांना श्वसनाचे आजार जडू लागले आहेत.या प्रकरणी वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून कारवाई होत नसल्याने अखेर ग्रामस्थांनी पालकमंत्र्यांच्या जनता दरबारात प्रश्न उपस्थित केला. पालकमंत्र्यांनी त्याची तत्काळ दखल घेत कारवाईचे आदेश दिल्याने अखेर वाड्यातील १८ टायर कंपन्या प्रदूषण नियंत्रण मंडळाने बंद केल्या.
सध्या वाडा तालुक्यात ५२ टायर कंपन्या सुरू असून या कंपन्यांमध्ये जुने टायर जाणून त्यापासून ऑइल,तारा काढून त्याची विक्री मोठ्या प्रमाणात केली जात आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे.या कारखान्यातील सांडपाणी हे येथील नाल्यात सोडलण्यात येत असल्याने मासे व जनावरांचा मृत्यू झाल्याच्या घटनाही घडल्या. शिवाय येथे काम करणाऱ्या कामगारांची कोणत्याही प्रकारची सुरक्षा बघितली जात नसल्याने या कंपन्यांमध्ये बॉयलरच्या स्फोटात आजवर अनेक कामगार मृत्युमुखी पडले आहेत.
तालुक्यातील उसर, दिनकर पाडा,वडवली, बिलोशी,पालसई,सापना, किरवली,नेहरोली,तोरणे, कोने,कोनसई या गावांच्या हद्दीत टायर कंपन्या वसल्या आहेत.फॅक्टरी लायसन्स कंपन्यांकडे नाहीत, वनविभागाची परवानगी ही नाही,नगर रचना विभागाकडून बांधकामाची सनद ही घेतलेली नाही,प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या ना हरकत दाखल्यावरच हे कारखाने उभे असल्याचे माहिती अधिकाराच्या आधारे हे उघड झाले असल्याचे येथील ग्रामस्थ कल्पेश पाटील त्यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

