दीपक मोहिते,
आरोग्य सुविधामध्ये वाढ करण्यासाठी आरोग्य मंत्रालय सकारात्मक- खा.सवरा,
पालघर लोकसभा मतदारसंघाचे खा.हेमंत सवरा यांनी लोकसभेत गरीब,ग्रामीण व आदिवासी बांधवांसाठी केंद्र सरकारच्या लोककल्याणकारी योजनांचे कौतुक केले.
” गरीब व आदिवासी समाजासाठी केंद्र सरकारच्या आरोग्यविषयक योजना वरदान ठरत आहेत.त्यामुळे जनता,सरकारच्या या योजनेची आभारी आहे,” असे खा.सवरा यांनी सभागृहात सांगितले.
केंद्र सरकारने १ हजार ९६१ आजारांच्या उपचारांचा समावेश विविध योजनांमध्ये केला आहे.परंतु कॅन्सर, हृदयविकार,अवयव प्रत्यारोपण यांसारख्या जीवघेण्या आणि खर्चिक आजारांसाठी अधिक सहाय्याची आवश्यकता आहे.त्यामुळे सरकार ” टॉप अप स्कीम,” लागू करण्याचा विचार करत आहे का ? असा महत्त्वाचा प्रश्न खा.सवरा यांनी सभागृहात उपस्थित केला.
गरीब रुग्णांना उत्तम वैद्यकीय उपचार मिळावे,यासाठी सरकार अधिक सकारात्मक पाउल उचलेल,अशी आशा व्यक्त करत खा.हेमंत सवरा यांनी सरकारचे आभार मानले.या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी.नड्डा यांनी केंद्र सरकार आरोग्य सुविधांमध्ये सातत्याने सुधारणा करत असून,गरीब व गरजू रुग्णांना जास्तीत जास्त लाभ मिळावा यासाठी नवनवीन उपाययोजना करत असल्याचे स्पष्ट केले.
ते पुढे म्हणाले की आयुष्मान भारत योजना सुरू होताना ५० कोटी नागरिकांचा समावेश करण्यात आला होता.
लोकसंख्या वाढीचा विचार करून सामाजिक व आर्थिक जनगणना ( एस इसीसी ) डेटा आणि राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा ( नफसा एनएसएफ एस ) यासोबत योजना जोडण्यात आली आहे.त्यामुळे लाभार्थ्यांची संख्या आता ६२ कोटींवर पोहोचली आहे.
ही जगातील सर्वात मोठी आरोग्य कव्हरेज योजना आहे.
महाराष्ट्र राज्यातील लाभार्थी संख्या १ कोटी ३२ लाख ९२ हजार ६५० लोकांनी आतापर्यंत या योजनेचा लाभ घेतला आहे.७० वर्षांवरील प्रत्येक नागरिकाला,त्यांच्या उत्पन्नाची कोणतीही अट नसताना,दरवर्षी ५ लाख रु.चे आरोग्य कव्हरेज मिळेल.
सध्या १हजार ९६० वैद्यकीय उपचार पद्धती ( प्रोसीजर्स ) या योजनेत समाविष्ट आहेत. नवनवीन आजार व उपचार पद्धती समाविष्ट करण्यासाठी वेळोवेळी सुधारणा केली जाते आणि भविष्यात अधिकाधिक गंभीर आजारांचा समावेश करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे.
ही योजना अधिक प्रभावी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असून,प्रत्येक गरजू नागरिकाला उत्तम वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे,असा विश्वास आरोग्य मंत्री जे.पी.नड्डा यांनी यावेळी व्यक्त केला.

