सुरेश वैद्य,पालघर
जिल्हा परिषद पालघरच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी मनोज रानडे,
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून मनोज रानडे यांची नियुक्ती झाली आहे.आज संध्याकाळी ६.०० वाजता त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार स्विकारला.
मावळते मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे यांनी त्यांच्याकडे पदभार सोपवला.यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे,प्रकल्प संचालिका डॉ. रूपाली सातपुते आणि
सर्व विभाग प्रमुख, गट विकास अधिकारी यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी सर्व विभाग प्रमुख आणि गटविकास अधिकारी यांच्याशी परिचय करून त्यांच्या कामाचा थोडक्यात आढावा घेतला.
प्रशासन आणि महसूल क्षेत्रातील व्यापक अनुभव असलेल्या रानडे यांची ही नियुक्ती जिल्ह्यासाठी महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
मनोज रानडे हे एम.एस्सी. ( ऍग्रिकल्चर ) पदवीधारक असून,त्यांनी आपल्या प्रशासकीय सेवेत विविध महत्त्वाची पदे भूषवली आहेत. त्यांनी उपविभागीय अधिकारी ( रत्नागिरी ),जिल्हा पुनर्वसन अधिकारी ( सिंधुदुर्ग ), उपजिल्हाधिकारी ( ठाणे ) आणि महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीच्या मानव संसाधन विभागात कार्यकारी संचालक म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे.
महसूल,पुनर्वसन,जनगणना, तसेच आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
२०१३ मध्ये उत्तराखंड राज्यात आलेल्या महापुराच्या वेळी महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांच्या वतीने त्यांनी मदतकार्य केले होते,ज्याबद्दल त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला होता.
२००२,२००४,आणि २०११ मध्य उत्कृष्ट उपजिल्हाधिकारी म्हणून गौरवण्यात आले आहे.
उपविभागीय अधिकारी असताना रत्नागिरी जिल्ह्यातील ७/१२ संगणकीकरणाचे काम पूर्ण करण्यास त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.मनोज रानडे यांनी जुलै २०१६ ते नोव्हेंबर २०१९ या कालावधीत महसूल व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे ‘खाजगी सचिव’ म्हणून जबाबदारी सांभाळली. २०१९ पासून उपायुक्त सामान्य प्रशासन कोकण भवन या पदावर ते कार्यरत होते.यावेळी विधान परिषद निवडणुका,तसेच कोविड कालावधीत कोकण विभागातील समन्वयाचे काम त्यांनी केले.त्यांच्यातर्फे नगरपरिषदांमध्ये तत्कालीन ग्रामपंचायतीच्या पात्र कर्मचाऱ्यांच्या समावेशनाबाबत विभागीय स्तरापर्यंतचे समावेशन पूर्ण करून राज्यस्तरावरील ३४९ पदांचा अधिसंख्य पद निर्मितीचा प्रस्ताव शासनास सादर करण्यात आला.नागरी क्षेत्रातील पी.एम.गती शक्ती,पंतप्रधान आवास योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान,पी.एम. व स्वानिधी योजना यामध्ये त्यांनी उत्कृष्ट काम केले आहे.पालघर जिल्हा परिषद येथे रुजू होण्याआधी मनोज रानडे यांनी संचालक नगर परिषद म्हणून ऑगस्ट २०२३ ते आज पर्यंत काम करताना महाराष्ट्र नगर परिषद राज्यसेवा सह वर्गातील १ हजार ७८२ पदे भरण्याच्या अनुषंगाने २०२४ मध्ये टीसीएसतर्फे यशस्वीपणे परीक्षा पार पाडून नियुक्त्या केल्या.जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर काम करताना ग्रामीण विकास, शिक्षण,आरोग्य,कृषी, जलसंधारण आणि पायाभूत सुविधा सुधारणे,यावर त्यांचा विशेष भर असेल.आदिवासी आणि दुर्गम भागातील योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि डिजिटल प्रशासनाला चालना देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू,अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.
त्यांच्या कार्यकाळात जिल्हा परिषद अधिक गतिमान आणि कार्यक्षम होईल,अशी आशा व्यक्त केली जात आहे.

