दीपक मोहिते,
” भ्रष्टाचाराची गटारगंगा,”
वसई विरार मनपा ; हजारो कोटी रु.खर्च होऊनही शहराला बकालपणाच,
वसई विरार शहर महानगरपालिका दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नालेसफाई व दैनंदिन साफसफाईवर ( कचरा उचलणे,रस्ते झाडणे ) हजारो कोटी रु.खर्च करते.पण आरोग्य विभागाचे अधिकारी व ठेकेदार यांच्या भ्रष्ट कारभारामुळे शहराचा बकालपणा काही नाहीसा होऊ शकला नाही.त्यामुळे दर पावसाळ्यात येथील करदात्यांना अस्मानी संकटाला तोंड द्यावे लागते.गेली अनेक वर्षे हे दुष्टचक्र असंच सुरू आहे.
या महानगरपालिकेला अधून मधून स्वच्छतेचे पुरस्कार मिळत असतात,ते कसे मिळतात ? हा एक संशोधनाचा विषय आहे.असो,पण हे पुरस्कार देताना कोणते निकष लावण्यात येतात,हे त्या परमेश्वरालाच माहीत असावे.शहराच्या अनेक भागात सकाळी अकरा वाजेपर्यंत कचऱ्याचे ढीग पाहायला मिळतात.या कचऱ्याच्या ढिगामध्ये कुत्रे व भिकारी यांचा शोध कार्यक्रम सुरू असतो.कचरा उचलणे व रस्ते साफसफाई,यासाठी प्रशासनाने प्रभागनिहाय ठेके दिले आहेत.त्यासाठी प्रशासन या ठेकेदारांना वर्षाकाठी शेकडो कोटी रु.देत असते.पण करदात्यांचे हे पैसे कारणी लागत नाहीत.ठेकेदार या सर्व कामावर पुरेसे कामगार लावत नसल्यामुळे ही कामे प्रभावीपणे होत नाहीत.
तसेच पावसाळ्यापूर्वी नालेसफाईवर कोट्यवधी रु.ची उधळपट्टी होत असते.पण नाल्यात गाळ व तुंबलेला कचरा मात्र नाल्याच्या बाहेर पडत नाही.त्यामुळे शहराच्या अनेक भागात पावसाळी पाण्याचा निचरा होत नाही.त्यामुळे दर पावसाळ्यात नागरिकांचे हाल कुत्रं खात नाही.आता पावसाळा सुरू होण्यास तीन महिने आहेत,पण नालेसफाईच्या कामास अद्याप सुरुवात करण्यात आलेली नाही.मनवेलपाडा-संतनगर येथील नाला कचऱ्यामुळे तुडुंब भरलेला आहे.पण प्रभाग समितीच्या सहा. आयुक्तांच्या लेखी तो व्यवस्थित आहे.मध्यंतरी महानगरपालिका प्रशासनाने रस्ते सफाईसाठी परदेशातून तीन वाहने आणली,पण ती वाहने कोणते रस्ते साफ करतात,हेच करदात्यांना माहीत नाही.रस्ते सुस्थितीत नसताना ही वाहने खरेदी करण्यामागे मनपा अधिकाऱ्यांचा काय उद्देश होता,हे तुम्हा-आम्हाला कोणी सांगायला नको.

