जव्हार प्रतिनिधी,
कै. विष्णु उर्फ (अण्णा ) हेमंत मुकणे – मानवतेच्या सेवेसाठी एक समर्पित जीवन.
जीवन हे क्षणभंगुर असले तरी काही माणसे अशी असतात की त्यांच्या कार्यामुळे त्यांची आठवण कायम ताजी राहते. कै. विष्णुपंत (अण्णा) हेमंत मुकणे हे असेच एक थोर व्यक्तिमत्त्व होते.ज्यांनी आपले आयुष्य समाजसेवेसाठी अर्पण केले.त्यांच्या निधनाने केवळ जव्हार तालुकाच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राने एक कर्तृत्ववान योद्धा गमावला आहे.कै.विष्णु ( अण्णा ) हेमंत मुकणे यांचा जन्म अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत झाला. वयाच्या दुसऱ्या वर्षी वडीलांचे छत्र हरवले.त्या काळात विधवा महिलांना समाजाने दिलेली वागणूक फारशी सन्मानजनक नसायची.मात्र,त्यांच्या आई भागूबाईंनी हार न मानता आपल्या मुलांना शिक्षण देण्याचा निर्धार केला.
विष्णु ( अण्णा ) यांचे प्राथमिक शिक्षण जव्हार येथे झाले.शिक्षणासाठी पैशांची कमतरता असल्यामुळे त्यांनी स्वतः श्रम करून शिक्षणाचा खर्च भागवला.बालपणातच त्यांच्यात असलेली सामाजिक भान आणि नेतृत्वगुण दिसू लागले होते.गायन आणि अभिनयाची आवड असल्याने त्यांनी कम्युनिस्ट कार्यकर्ते रॉक काव्हरबाले यांच्या मार्गदर्शनाखाली स्फूर्तिगीते आणि नाट्यछटा सादर करायला सुरुवात केली. त्यामुळे त्यांच्यामध्ये असलेली प्रतिभा दूरवर ओळखली जाऊ लागली.कॉंग्रेस सेवा दलाचे प्रमुखपद स्विकारल्यानंतर विष्णु अण्णा विविध सामाजिक चळवळींमध्ये सक्रिय झाले.त्यांनी भूदान चळवळीत भाग घेतला आणि देशभरातील विविध नेत्यांच्या पदयात्रांमध्ये सहभागी झाले. या काळात मोरारजी देसाई, अण्णासाहेब वर्तक, भाऊसाहेब हिरे यांसारख्या दिग्गज नेत्यांनी त्यांच्या कार्याची दखल घेतली.सन १९५८ मध्ये सॅनिटरी इन्स्पेक्टर म्हणून नोकरी करण्यास सुरुवात करताच त्यांनी आरोग्य सेवेमध्ये आमूलाग्र बदल घडवले.त्यांनी कोकणातील दुर्गम भागात जाऊन साथीच्या रोगांशी झुंज दिली.
१९६२ मध्ये दापोली तालुक्यात कॉलऱ्याची साथ आली असताना त्यांनी जीव धोक्यात घालून अनेक रुग्णांना मदत केली. मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याचे कठीण कार्यही त्यांनी स्वतः केले.१९७७ मध्ये सूर्या नदीला महापुर आल्याने अनेक गावांत साथीचे रोग पसरले.विष्णु अण्णांनी औषधे पाठीवर बांधून जीव धोक्यात घालून पूरग्रस्त भागात जाऊन रुग्णांची सेवा केली.त्यांनी या काळात मीठ आणि कांदा खाऊन आठ दिवस काढले.१९८६ साली जव्हार शहरात गॅस्ट्रोची मोठी साथ आली होती.त्यावेळी संपूर्ण शहर अस्मानी संकटात असताना विष्णु अण्णांनी डॉक्टर,सेवाभावी कार्यकर्ते आणि विद्यार्थ्यांना हाताशी धरून हजारो लोकांचे प्राण वाचवले.१९९२ मध्ये वावर वांगणी गावात कुपोषणामुळे शेकडो बालके दगावली, शासन निष्क्रीय असताना विष्णु अण्णांनी परिस्थितीवर मात करून अन्नधान्य आणि औषधोपचार पोहोचवले.
१९९३ मध्ये सावर्डे गावात गॅस्ट्रोची साथीने थैमान घातले असताना,ते स्वतः त्या गावात गेले.मात्र,दुर्दैवाने तेथे मदतकार्य करत असताना एका मोठ्या दगडाखाली सापडल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली.या प्रसंगानंतरही त्यांनी समाजकार्य सुरूच ठेवले.सेवानिवृत्तीनंतरही त्यांची सामाजिक बांधिलकी कायम राहिली.त्यांच्या मित्र कै.डॉ.अष्टीकर यांनी त्यांना भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्यास प्रवृत्त केले.त्यांनी जव्हार,मोखाडा आणि विक्रमगड,या आदिवासीबहुल भागात भारतीय जनता पार्टी पक्ष मजबूत उभा केला.
ते भारतीय जनता पक्षाचे तीन वेळा जव्हार तालुका अध्यक्ष म्हणून कार्यरत होते.
त्यांनी आपल्या संघटन कौशल्याने पक्षाला बळकटी दिली.
त्यांच्या वक्तृत्वामुळे पक्षाच्या प्रचार सभांमध्ये त्यांना कायम बोलावण्यात येत असे.त्याची अनेक भाषणे गाजली. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांनी त्यावेळी ठाणे जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टी मागासवर्गीय मोर्चाचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली.
त्यांच्या या महान कार्यात त्यांच्या पत्नी सी.लतिका यांचा मोठा हातभार होता.त्यांनी आपल्या कुटुंबाला उत्तम शिक्षण आणि संस्कार दिले. त्यांच्या मुलांनीही त्यांचा आदर्श घेतला.त्यांचा सामाजिक प्रभाव इतका मोठा होता की त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक तरुणांनी सामाजिक व राजकीय कार्यात पुढे येण्याची प्रेरणा घेतली.
त्यांच्या संपूर्ण सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना अनेक मान-सन्मान आणि पुरस्कार प्राप्त झाले.
समाजातील मागासवर्गीयांसाठी भरीव योगदान दिल्याबद्दल त्यांना ” दलितमित्र, ” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.तसेच
“जनसेवा गौरव पुरस्कार,”
“आदिवासी समाजभूषण,” ही त्यांना मिळाले.
वयाच्या ९१ व्या वर्षी १८ मार्च २०२५ रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.त्यांच्या निधनाने समाजसेवेचा एक प्रेरणादायी अध्याय संपला.
” माणसं येतात आणि जातात,” पण काहीची आठवण कायम स्मरणात राहते.
कै.विष्णु ( अण्णा ) मुकणे यांचे जीवन म्हणजेच समाजासाठी झिजलेले एक प्रेरणादायी पर्व होते. त्यांच्या स्मृती सदैव जव्हारकरांच्या हृदयात राहतील.

