जव्हार प्रतिनिधी,
जव्हार येथे टीबी मुक्त गाव जनजागृती अभियान संपन्न.
जे.एस.डब्लू.फाउंडेशन फेलोशिप कार्यक्रमांतर्गत टीबी मुक्त गाव जनजागृती अभियान मोठ्या उत्साहात पार पडले.जामसर,तालुका जव्हार येथील ग्रामपंचायत अंतर्गत वेलीचापाडा,देवतळी, तेलीचापाडा, बहुपाडा या गावांमध्ये तीन दिवस विविध जनजागृती उपक्रम राबवण्यात आले.
जव्हारसारख्या आदिवासी आणि दुर्गम भागात क्षयरोग (टीबी) हा एक महत्त्वाचा विषय आहे.नुकत्याच झालेल्या या मोहिमेत २०० हून अधिक ग्रामस्थ सक्रिय सहभागी झाले होते.स्थानिक आरोग्य यंत्रणा आणि स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने ही मोहीम प्रभावीपणे राबवण्यात आली. वाढती लोकसंख्या,आरोग्य शिक्षणाचा अभाव आणि अंधश्रद्धा यामुळे टीबीवरील जनजागृतीची गरज ओळखून ” जेएसडब्लू फाउंडेशन आणि स्थानिक आरोग्य संस्थांनी एकत्र येऊन हा उपक्रम राबवला.
यावेळी नर्सिंग विद्यार्थ्यांनी पथनाट्य,पोस्टर प्रदर्शन आणि आरोग्य गाणी सादर केली.या अभियानात जव्हार येथील श्री गजानन महाराज कॉलेज ऑफ नर्सिंग अँड रिसर्च सेंटरच्या विद्यार्थ्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांनी टीबी प्रतिबंध,चाचणी, उपचार आणि सरकारी योजनांबाबत माहितीपूर्ण पोस्टर तयार केले.यासोबत पथनाट्य सादर करून क्षयरोगावरील महत्त्वपूर्ण माहिती लोकांपर्यंत पोहोचवली.या पथनाट्यात टीबीची लक्षणे,तपासणी आणि प्रतिबंधात्मक उपाय यावर प्रकाश टाकण्यात आला.
संपूर्ण मोहिमे दरम्यान आरोग्य तज्ज्ञ,विद्यार्थी आणि स्थानिक आरोग्य कर्मचारी यांनी भाग घेतला.यावेळी
डॉट्स उपचार पद्धती आणि टीबीचे औषधोपचार,
सरकारी योजनांची माहिती, मोफत चाचण्या,उपचार आणि औषधे टीबी टोल-फ्री हेल्पलाइन क्रमांक आणि आरोग्य सेवा उपलब्धता इ. माहिती देण्यात आली.या मोहिमेत आरोग्यवर्धनी केंद्र-वडपाडा येथील आरोग्य कर्मचारी कु.ऐश्वरी भोईर. एस. एल.अवतार,कल्पना पढेर यांनी आपले योगदान दिले. याशिवाय,पी.वाय.भरसट यांनी ग्रामस्थांना एकत्र आणण्यासाठी मोलाचे कार्य केले.ही संपूर्ण मोहीम जेएसडब्ल्यू फाउंडेशन फेलोशिप फेलो अभिषेक सागर यांच्या पुढाकाराने पार पडली.त्यांनी श्रीगजानन महाराज कॉलेज ऑफ नर्सिंग अँड रिसर्च सेंटरच्या उपप्राचार्या सोनाली गायकवाड,त्यांची टीम आणि जेएसडब्ल्यू फाउंडेशन फेलोशिपच्या प्रोजेक्ट मेंटॉर श्रीमती संगीता मालशे आणि सहकारी विवेक शहारे यांचे विशेष आभार मानले.ही जनजागृती मोहीम ग्रामस्थांसाठी अत्यंत माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी ठरली.आरोग्याविषयीच्या चुकीच्या समजुती दूर करून टीबीविषयी समाजाची समज वाढवण्यासाठी आणि वेळेत निदान व उपचार घेण्यासाठी हा उपक्रम एक महत्त्वाचे पाऊल ठरला.

