दीपक मोहिते,
पालघर जिल्ह्याच्या समुद्रकिनारी भागात चौथी मुंबई आकाराला येणार…
मुंबई व आसपासच्या परिसराचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी केंद्र व राज्यसरकारतर्फे संयुक्तरित्या विविध महत्वाचे प्रकल्प राबवण्यास सुरुवात झाली आहे.
वर्सोवा ते मढ आणि वर्सोवा पासून भाईंदरपर्यंत एक सिलिंक जाणार आहे.हा सिलिंक मढहून पुढे विरारपर्यंत जाणार आहे.मुंबईची ६० टक्के वाहतूक ही पश्चिम भागात आहे.हे सिलिंक एकदा सुरू झाले तर पश्चिमेस असलेल्या मुंबई – अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक डायव्हर्ट होईल.सध्या मुंबईहून विरारला जाण्यासाठी किमान तीन ते चार तास लागतात.हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर हे अंतर अवघे २५ मिनिटांवर येईल,असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्या मनी नाईन फायनान्शियल फ्रिडम समिटमध्ये बोलताना सांगितले.
ते पुढे म्हणाले की एक मल्टिमॉडेल कॉरिडॉर पण आपण तयार करत आहोत.तो विरार – अलिबाग दरम्यान असेल.त्यासाठी एक लूप तयार करण्यात येत आहे.त्यामुळे मुंबईला एक प्रकाराचा सर्क्युलर रोड मिळणार आहे.त्यासोबत एक महत्त्वाचा प्रकल्प आहे तो म्हणजे वाढवण बंदर होय. डहाणू वाढवण येथे नवीन अद्ययावत असे बंदर आपण उभारत आहोत.या बंदरामुळे मेरिटाईम ताकद निर्माण होणार आहे.जीएनपीटीचे हे बंदर आपल्या देशाचे ६५ टक्के कंटेनर वाहतूक हाताळणारे आहे.प्रस्तावित वाढवण बंदर हे उरण येथे असलेल्या जेएनपीटीपेक्षा तीनपट मोठे आहे.नव्याने होत असलेल्या या महाकाय बंदरात जगातील सर्वात मोठी जहाजे येणार आहेत.त्यासोबत आम्ही या बंदरासाठी आवश्यक असलेले एक विमानतळ देखील उभारणार आहोत.तसेच बुलेट ट्रेन प्रकल्पही राबवत आहोत.तिसरी मुंबई अटल सेतूजवळ होणार आहे,तर चौथी मुंबई ही वाढवण बंदराजवळ होणार आहे असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

