भरत जोशी,मुंबई,
महत्वाची अंतिम लढत,
भारताची लढत न्यूझीलंडशी झाल्यास फायदेशीर ठरू शकेल…
भारताणने काल ऑस्ट्रेलियाचा उपणत्या फेरीत ५ विकेट्स राखत पराभव केला.भारताचा मधल्या फळीतील फलंदाज विराट कोहलीच्या दमदार कामगिरीच्या जोरावर भारताला हा विजय मिळवता आला.
या विजयाने भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात धडक मारली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील दुसरा उपांत्य सामना न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका दरम्यान आज होत असून हा सामना पाकिस्तानमधील लाहोर येथे होणार आहे. या सामन्यात जिंकणारा संघ ९ मार्च रोजी दुबईमधील मैदानावर भारताविरुद्ध अंतिम सामना खेळेल. मात्र या दोन संघांपैकी भारतासाठी कोणता संघ अधिक सोयीस्कर ठरेल याबद्दल क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दुसऱ्या सेमी फायनलमध्ये न्यूझीलंड आणि साऊथ आफ्रिका यांच्यात लढत होत आहे. लाहोरमध्ये दुपारी अडीच वाजता मॅचला सुरुवात होईल. न्यूझीलंड आणि साऊथ आफ्रिका यांच्यात जो जिंकेल तो संघ अंतिम सामन्यात टीम इंडियाशी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी मैदानात उतरेल. साऊथ आफ्रिका आणि न्यूझीलंडने या स्पर्धेत उत्तम कामगिरी केली आहे.दोन्ही संघात एकट्याच्या जीवावर सामना फिरवू शकणारे अनेक खेळाडू आहेत.
भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान एकूण ९४ एकदिवसीय सामने झालेत. यापैकी ४० सामने भारताने जिंकले असून ५१ सामने दक्षिण आफ्रिकेने जिंकले आहेत.तीन सामन्यामध्ये कोणताही निकाल लागला नाही. भारतीय संघाने यापैकी १८ सामने आपल्या देशात जिंकले आहेत.तर दक्षिण आफ्रिकेने २६ सामने घरच्या मैदानावर जिंकलेत.घरच्या मैदानांवर न खेळलेल्या सामन्यांपैकी १२ सामन्यांमध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेला पराभूत केले आहे.तर दक्षिण आफ्रिकेनेही त्यांच्या घरगुती मैदानांवर न खेळेल्या सामन्यांपैकी १४ सामन्यांमध्ये भारताला पाणी पाजले आहे. त्रयस्थ ठिकाणी खेळवलेल्या भारत आणि दक्षिण आफ्रिका सामन्यांपैकी १० सामने भारताने जिंकलेत तर ११ सामने दक्षिण आफ्रिकेने जिंकले आहेत.
भारत आणि न्यूझीलंडमध्ये आतापर्यंत एकूण ११९ एकदिवसीय सामने खेळवण्यात आले असून त्यापैकी ६१ सामने भारताने जिंकले आहेत.न्यूझीलंडने भारताला ५० सामन्यांमध्ये धूळ चारली असून सात सामन्यांमध्ये कोणताही निकाल लागला नाही.दोन्ही संघांमधील एक सामना टाय झाला आहे.भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यांपैकी भारताने घरच्या मैदानावर ३१ सामने जिंकलेत तर न्यूझीलंडने २६ सामन्यात घरच्या मैदानावर विजय मिळवला आहे.अन्य देशाच्या मैदानावर खेळताना हे दोन्ही संघ जेव्हा आमने-सामने आले तेव्हा १४ वेळा भारत तर ८ वेळा न्यूझीलंडने बाजी मारली आहे.त्रयस्थ ठिकाणी दोन्ही संघांनी एकमेकांना १६ वेळा पराभूत केलं आहे.
वरील आकडेवारी पाहिल्यास दक्षिण आफ्रिकेपेक्षा न्यूझीलंडच्या संघाविरुद्ध अंतिम सामना खेळणं भारताला फायदेशीर ठरू शकतं. त्यामुळे ९ मार्च रोजी भारत अंतिम सामन्यासाठी मैदानात उतरेल तेव्हा समोर न्यूझीलंड असेल तर ते भारताला अधिक फायद्याचं ठरणार आहे.

