वसंत भोईर,वाडा
उन्हाळी मिरची खाते भाव;
फुल किडीला रोखणार कसे?
तालुक्यातील शेतकऱ्यांना वेळोवेळी भाजीपालाच आर्थिकदृष्ट्या तारत आहे. मात्र,उन्हाळ्यात हिरव्या मिरचीला मोठी मागणी असते. त्यामुळे शेतकरी उन्हाळी मिरचीची अधिक लागवड करत असतात.पीक बहरत आले की या पिकांवर रोगराई त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात कीड लागते.तिला रोखण्याकामी मात्र शेतकऱ्याची दमछाक होत असते.
वाडा बाजारपेठेत सध्या मिरचीची आवक वाढली आहे. काही दिवसांपूर्वी मिरची ८० रू.प्रति किलो दराने विक्री होत होती.आताही सरासरी ५० रु. भाव मिळत आहे.
विहीर,बोरवेल कमी पाणी असलेले भाजीपाला उत्पादक शेतकरी मिरची पीकाला पहिली पसंती देत आहेत. ठिबकच्या साहाय्याने मिरचीला पाणी देण्यात येते. तसेच मल्चिंगवर ही मिरचीची लागवड करून जास्तीत जास्त उत्पादन घेण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
या रोगांचा जास्त प्रादुर्भाव होत असतो.उष्णतेमुळे मावा, फुल किडे यांचा प्रादुर्भाव मिरची पिकावर दिसून येतो. किड्यांचे पिल्ले आणि प्रौढ पानाच्या व वरच्या बाजूस राहतात.हे किडे पाने खरवडून त्यातून बाहेर नेणारा रस शोषून घेतात.त्यामुळे या किडीचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.अन्यथा शेतकऱ्यांना पिकांच्या उत्पादनात घट सहन करावी लागते.
उन्हाळी मिरचीच्या उत्पन्नात वर्षभराची कमाई होत असल्याने सर्वाधिक शेतकरी सध्या मिरचीच्या पीकाकडे वळले आहेत.
उन्हाळ्यात मिरची लागवड केल्यास मोठ्या प्रमाणात संगोपन करावे लागते.मिरची बहरत आल्यानंतर कीड लागते. त्यासाठी या किडीचा बंदोबस्त करण्याकरता कीटकनाशकांची फवारणी करावी लागते.
– किशोर पाटील, शेतकरी

