शुभम सावंत, विरार
विरार येथे धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे महास्वच्छता अभियान संपन्न,
महाराष्ट्रभुषण डाॅ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान,रेवदंडा यांच्या सौजन्याने आज सकाळी ८.३० वा.वसई विरार महानगरपालिका क्षेत्रातील मुख्य शहरे व आसपासच्या गावातील मुख्य रस्त्यांवर, अंतर्गत रस्ते,बाजारपेठा, सरकारी कार्यालये,सरकारी दवाखाने,पोलीस ठाणे परिसर, एसटी स्टँड व रेल्वेस्थानका बाहेरचे परिसरात महास्वच्छता अभियान राबवण्यात आले.
” स्वच्छ भारत अभियानाचे,” राज्यपालांनी नियुक्त केलेले स्वच्छतादूत डाॅ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानाचे अध्यक्ष ” पद्मश्री,” ने सन्मानित डाॅ.आप्पासाहेब धर्माधिकारी तथा दत्तात्रेय नारायण धर्माधिकारी व डाॅ.सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आज महास्वच्छता अभियान आयोजित करण्यात आले होते.डाॅ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान,रेवदंडा हे एक सेवादायी समाजाभिमुख उपक्रम राबवणारे प्रतिष्ठान आहे.या भव्य स्वच्छता अभियानामध्ये एकूण ४ हजार ३२७ श्रीसदस्य स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले होते.एकूण ३९ हजार २०९ कि.( ३९.२०९ टन ) सुका कचरा व ७ हजार ०९४ कि. ( ७.०९४ टन ) ओला कचरा असा एकूण ४६ हजार ३०३ कि. ( ४६.३०३ टन ) कचरा गोळा करण्यात आला.मोठ्या प्रमाणात संकलित केलेला कचरा वाहून नेण्याकरिता वसई विरार शहर महापालिका प्रशासनाने मोलाचे सहकार्य केले.
या महास्वच्छता अभियानामध्ये आ.राजन नाईक,विरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश गायकवाड,विविध सामाजिक व
राजकीय पक्षांचे पदाधिकारी इ.मान्यवर तसेच विभागातील सामान्य नागरिक सहभागी झाले होते.आ.राजन नाईक म्हणाले,स्वच्छतेविषयी जनजागृती करणे,अत्यंत गरजेचे असून त्यांनी स्वतः झाडू हातात घेऊन या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवला लावला.पुढे ते म्हणाले,प्रतिष्ठानच्या या अभियानाने जनतेमध्ये सकारात्मक संदेश जात असून अशा कार्याने आम्हाला प्रेरणा मिळत असते.प्रतिष्ठान करत असलेले हे कार्य वाखाणण्याजोगे आहे.हे अभियान घराघरात पोहोचावे आणि महाराष्ट्र राज्य सुजलाम सुफलाम व्हावं,अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. स्वच्छता असेल आरोग्य सुद्धा उत्तम राहते.डासांचा प्रादुर्भाव रोखला जाऊन रोगराईला आळा बसतो.प्रतिष्ठान अतिशय चांगले कार्य करीत असून,स्वच्छतेबाबत मुलांना शाळेतून धडे दिले जातात. त्याकडे पालक वर्गाचे दुर्लक्ष होत आहे.पालकांनी देखील स्वच्छतेसाठी मुलांवर लहानपणापासून संस्कार करायला हवेत,इत्यादी प्रतिक्रिया स्वच्छता अभियानात सहभागी झालेल्या नागरिकांनी दिल्या.

