वसंत भोईर,वाडा
सिंचन विहीर योजनेमुळे पाण्याचा प्रश्न मिटला,
पालघर जिल्हातील विविध आदिवासी बहुल भागामध्ये पाण्याचे दुर्भिक्ष्य आणि दुष्काळ असताना वाडा तालुक्यातील गोराड – वडपाडा व वसई तालुक्यातील थळ्याचापाडा या गावामध्ये प्रसाद चिकित्सा,गणेशपुरी यांच्या प्रयत्नामुळे गावकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.काही महिन्यापूर्वी दुष्काळाचे चटके सोसणारे आणि पाण्यासाठी वणवण भटकंती करणारे ही गावे विहीर उपलब्ध झाल्यामुळे सध्या सुखावले आहेत.
प्रसाद चिकित्सा संस्था गावकऱ्यांनी केलेले सहकार्य त्यातून हे यश मिळाले आहे.या गावामध्ये मार्च महिन्यानंतर पाण्यासाठी महिलांना पायपीट करावी लागत असे.त्यावर उपाययोजना करण्यासाठी प्रसाद चिकित्सा धर्मादाय संस्थेने विहिरीसाठी जागा शोधल्या व नवीन विहीरी बांधून दिल्या.त्यामुळे लोकांना आता भरपूर प्रमाणात पाणी मिळू लागले आहे.त्यांची पाण्यासाठी होणारी भटकंती आता पूर्णतः थांबली आहे.पाण्यासाठी आम्हाला किमान आठ महिने वणवण करावी लागत होती.मात्र आता या त्रासातून आमची सुटका झाली आहे,असे सुजाता वळवी यांनी सांगितले.
तर शेतकऱ्यांसाठी ५५ विहिरी बांधून देण्यात आल्या आहेत. जेणेकरून शेतकऱ्यांना दुबार पीक घेता यावे,असा उद्देश यामागे आहे.त्यासाठी क्रोडा कंपनी,रोटरी क्लब आणि प्रसाद प्रोजेक्ट यांचे सहकार्य लाभले,असे संस्थेचे कार्यकारी व्यवस्थापक मिलिंद नरगुंद यांनी सांगितले.

