जव्हार प्रतिनिधी,
वडोली ग्रामपंचायत क्षेत्रातील ६० विद्यार्थ्यांना सौर दिव्याचे वाटप.
” अंधाराकडून प्रकाशाकडे,” या प्रकल्पाच्या माध्यमातून वडोली ग्रामपंचायत हद्दीतील ६० विद्यार्थ्यांना सौर दिव्यांचे मोफत वाटप करण्यात आले. शासकीय आश्रमशाळा,देहेरे येथील विद्यार्थी शिवम याने प्रेरित केलेल्या या उपक्रमाचा भव्य कार्यक्रम आज ग्रामपंचायत वडोली येथे पार पडला.
या कार्यक्रमाला विक्रमगड विधानसभा मतदारसंघाचे आ.हरिश्चंद्र भोये प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
अमेरिकेतील ” काइंडनेस ग्रोस हिअर,” या स्वयंसेवी संस्थेच्या अर्थसहाय्याने हा प्रकल्प राबवण्यात आला. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक असलेला प्रकाश मिळावा,हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेसमोर मेणबत्ती प्रज्वलित करण्यात आली. आ.हरिश्चंद्र भोये यांचा सरपंच कामिनी गावंढा आणि ग्रामस्थांतर्फे शाल आणि रोप देऊन स्वागत करण्यात आले.सदर कार्यक्रमास एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय जव्हारचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी (शिक्षण) सुभाष परदेशी,ग्रामसेविका मीरा वाघमारे,पंचायत समिती जव्हारचे चेतन शेवाळे,देहरे आश्रमशाळेचे शिक्षक, अंगणवाडी कर्मचारी आणि पत्रकार तसेच विद्यार्थी आणि ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कैवल्य एज्युकेशन फाउंडेशनच्या वंदना मौर्या यांनी प्रकल्पाचा उद्देश स्पष्ट करताना सांगितले की,ही संस्था सामाजिक बांधिलकी जपत समाजकार्य करते.या उपक्रमाच्या माध्यमातून ६० विद्यार्थ्यांना सौर दिवे देण्यात आले.त्यांच्या शिक्षणाच्या प्रवासात प्रकाश टाकण्याचा आमचा प्रयत्न आहे.
आ.हरिश्चंद्र भोये यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा देत सांगितले,जीवनात सातत्याने प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे. जर शिवमसारखा विद्यार्थी असा उपक्रम राबवू शकतो, तर इतर विद्यार्थीही समाजासाठी असे कार्य करू शकतात.त्यांनी अशा स्वयंसेवी संस्थांना पाठिंबा देण्याचे आवाहन यावेळी केले.त्यांनी वडोली ग्रामपंचायतीसाठी ” कम्युनिटी हॉल, ” मंजूर करण्यात येणार असल्याचे जाहीर केले.मात्र त्यासाठी गावाने जागा उपलब्ध करून द्यावी,असे त्यांनी आवाहन केले.सहाय्यक प्रकल्प अधिकारी सुभाष परदेशी यांनी हा उपक्रम वडोलीचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणारा असल्याचे सांगत शिवम आणि वंदना मौर्या यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले.या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी कैवल्य एज्युकेशन फाउंडेशनच्या वंदना मौर्या, त्यांचे पती संतोष,राम हटकर, रुक्सार,जिल्सी जॉर्ज यांचा महत्त्वाचा सहभाग होता.तसेच सिनियर मॅनेजर जनार्दन साळे आणि प्रोग्राम मॅनेजर सुनील गुप्ता यांचे मार्गदर्शन लाभले.कार्यक्रमाच्या शेवटी सरपंच कामिनी गावंढा यांनी सर्वांचे आभार मानले आणि वडोली ग्रामपंचायतीसाठी विविध योजनांवर चर्चा केली. उपस्थित विद्यार्थ्यांना अल्पोपहार देऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
” अंधाराकडून प्रकाशाकडे,”हा उपक्रम वडोलीच्या विद्यार्थ्यांसाठी उज्ज्वल भविष्याची वाट दाखवणारा ठरला आहे.

