शुभम सावंत,
विवा महाविद्यालयात “मराठी राजभाषा गौरव दिन,” मोठ्या उत्साहात साजरा..
मराठी ही महाराष्ट्राची मातृभाषा आहे आता तर मराठी भाषेला अभिजात भाषा म्हणून देखील दर्जा लाभलेला आहे. या मातृभाषेचा गौरव म्हणून व ज्येष्ठ कवी, साहित्यिक, नाटककार, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते वि. वा. शिरवाडकर म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके कुसुमाग्रज…
त्यांचा जन्मदिवस २७ फेब्रु.रोजी साजरा केला जातो. कुसुमाग्रज यांनी मराठी साहित्य विश्वात दिलेल्या योगदानाची दखल घेत त्यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून देशभरात हा दिवस ” मराठी राजभाषा गौरव दिन,” म्हणून साजरा केला जातो.या दिनाचे औचित्य साधून विवा महाविद्यालयातील मराठी वाङ्ममय मंडळ व ग्रंथालय विभाग,यांच्या संयुक्त विद्यमाने ” मराठी भाषा गौरव दिन,” दिमाखात साजरा करण्यात आला.
मराठी भाषा गौरव दिना निमित्त मराठी भाषा,साहित्य अन् संस्कृती,या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.वाङ्ममय मंडळाचे कार्यवाहक प्रा.कविता पाटील यांनी हे व्याख्यान दिले.
मराठी भाषेचे महत्व,भाषेमुळे व्यक्तीवर होणारे संस्कार,मातृभाषा आणि माध्यम संस्कृती,भाषा आणि माध्यमे यांचे नाते संबंध,इ.मुद्दे त्यांनी या व्याख्यानात मांडले.
मराठी वाङ्ममय मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला.प्राध्यापकांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पदक व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.ग्रंथालयाच्या ग्रंथपाल डॉ.नागरत्ना पलोटी यांनी आपल्या मनोगतातून स्थानिक भाषेचे महत्त्व अधोरेखित केले.
ग्रंथालय विभागातर्फे विभाग प्रमुख डॉ.नागरत्ना पलोटी यांनी विद्यार्थी,प्राध्यापक वर्ग व कर्मचारी,स्पर्धेतील विजेते व ग्रंथालय विभाग व समितीतील सदस्याचे असलेल्या योगदाना बद्दल प्रमाणपत्रे देऊन सन्मान केला.ग्रंथालय विभाग आणि विद्यार्थ्यांना जोडणारा एक महत्त्वाचा दुवा म्हणजे ” नॉलेज बीस,” कमिटी..या कमिटीच्या विद्यार्थ्यांनी ग्रंथालयाच्या विविध उपक्रमासाठी केलेल्या महत्त्वपूर्ण सहकार्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला.
ग्रंथालय विभागप्रमुख डॉ. नागरत्ना पलोटी,मराठी वाङ्मय मंडळाच्या कार्यवाहक कविता पाटील,वाङ्मय मंडळ समिती,ग्रंथालय समिती यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.या कार्यक्रमास महाविद्यालयाच्या विविध विभागाचे प्रमुख आवर्जून उपस्थित होते.
सदर कार्यक्रम यशस्वीरित्या होण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.वि.श.अडीगल,उपप्राचार्या डॉ.प्राजक्ता परांजपे,उपप्राचार्या डॉ.दीपा वर्मा यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन अंजली परांजपे यांनी केले.कार्यक्रमाचा समारोप अंजली परांजपे यांनी म्हंटलेल्या सुमधुर स्वरातील पसायदानाने करण्यात आला.

