जव्हार प्रतिनिधी,
जव्हार महाविद्यालयात मराठी राजभाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा,
जव्हार येथील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील मराठी विभागातर्फे ” मराठी भाषा गौरव दिना,” च्या निमित्ताने ” काव्यवाचन,” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.विजय शिंदे (अर्थशास्त्र विभाग प्रमुख) उपस्थित होते,तर प्रमुख पाहुणे म्हणून किशोर डोके ( जिल्हा परिषद शिक्षक, कवी, कथाकार ) उपस्थित होते.महाविद्यालयातील प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्षाच्या कला व वाणिज्य शाखेचे विद्यार्थी या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागगी झाले होते.
कार्यक्रमाची सुरुवात कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली.मराठी विभाग प्रमुख डॉ.राहुल पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. आपल्या प्रास्ताविकातून त्यांनी मराठी भाषेचा व साहित्याचा इतिहास उलगडून सांगत या कार्यक्रमाच्या आयोजनामागची भूमिका स्पष्ट केली.१५ विद्यार्थ्यांनी आपल्या स्वलिखित तसेच प्रसिद्ध मराठी कवींनी रचलेल्या कविता सादर करून उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले.याप्रसंगी गेल्या जाने. महिन्यात ” मराठी भाषा पंधरवडा,” च्या निमित्ताने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमध्ये बक्षीसपात्र विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे देऊन त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
प्रमुख पाहुणे किशोर डोके यांनी ” माझा बाप,” ही हृदयस्पर्शी कविता सादर केली.ही कविता ऐकताना उपस्थित श्रोत्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.मराठी भाषेच्या समृद्ध वारसावर प्रकाश टाकत त्यांनी विद्यार्थ्यांना आपल्या भाषेचा अभिमान बाळगण्याचा संदेश दिला.डॉ. विजय शिंदे यांनी अध्यक्षीय भाषणातून मराठी भाषेची महत्ता सांगितली.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा.महेंद्र कोंगिल यांनी केले, तर प्रा.ज्योत्स्ना राव यांनी सूत्रसंचालन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम.आर.मेश्राम आणि उपप्राचार्य डॉ.सुरेंद्र कदम यांनी मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाला डॉ.विनायक खातळे,प्रा.प्रताप देवरे आणि प्रा.सुधीर भोईर,डॉ.कांतीलाल पाटील इ. मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात मराठी भाषेच्या संवर्धनाचा नवा संकल्प विद्यार्थ्यांनी केला असून मराठी भाषा,ही केवळ संवादाचे माध्यम नसून आपल्या अस्मितेचा अभिमान आहे,हा संदेश या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रभावीपणे पोहोचवण्यात आला.

