ऋतुजा तिरोडकर,हडपसर,
पुणे बलात्कार : समस्त लाडक्या बहिणी भितीच्या सावटाखाली,
बदलापूर बलात्कार प्रकरणानंतर आता पुणे स्वारगेट येथे झालेल्या बलात्कार प्रकरणाने राज्य हादरून गेले आहे.घटना घडून गेल्यानंतर आपल्या सरकारी यंत्रणा खडबडून जाग्या होत असतात.या घटनेनंतरही असेच घडले.या घटनेतील नराधमाला हुडकून काढण्यासाठी पोलीस यंत्रणा आता सक्रिय झाल्या आहेत.पण ज्या महिलेवर हा प्रसंग ओढवला,त्या महिलेचे पुढच्या आयुष्याचे काय ? जर अशा घटना घडत राहिल्या तर महिलांना एकटे दुकटे फिरायला नको…
मानवतेला काळिमा फासणाऱ्या या घटनेने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. स्वारगेटसारख्या दिवसाचे २४ लोकांनी गजबजलेल्या एसटी आगारात त्या अबलेवर एकदा नाही तर दोन वेळा बलात्कार करतो,त्यावेळी त्या आगाराचे सुरक्षा रक्षक काय करत होते.आता या आगाराच्या २३ सुरक्षा रक्षकांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे. तशी घोषणा परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे.मंत्र्याची ही कृती म्हणजे ” वरातीमागून घोडे,” अशा स्वरूपाची आहे.या दुर्देवी घटनेनंतर तरी सरकारने आगारातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा अधून मधून घेण्यास सुरुवात केली पाहिजे.महामंडळाच्या जमिनी विकण्यासंदर्भात परिवहनमंत्र्यांनी जेवढी तत्परता दाखवली,तेवढी तत्परता आता राज्यातील आगाराच्या सुरक्षेविषयी दाखवली असती तर बरे झाले असते.केवळ ” लाडक्या बहिणी योजना,” राबवून बहिणीचे जीवन सुरक्षित होणार नाही.आज या बहिणी सरकारकडे आपल्या सुरक्षेची भीक मागत आहेत.लाडक्या बहिणींचा उदो उदो करत तुम्ही सत्तेत आलात,आता त्या लाडक्या बहिणींच्या सुरक्षेची जबाबदारीही तुम्हाला घ्यावी लागेल.कारण तुमच्या राज्यात हल्ली कोणीही सुरक्षित नाही. राज्याचे गृहखाते असून नसल्यासारखे आहे.महिला आयोग केवळ प्रसिद्धी माध्यमासमोर मिरवण्यात धन्यता मानत असते.त्यामुळे राज्यातील लाखो लाडक्या बहिणी सध्या भितीच्या सावटाखाली वावरत आहेत.
